कराड : पुढारी वृत्तसेवा
मागील वर्षाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा फटका बसू नये, यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे यावर विचार विनिमय करण्यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्रातून कर्नाटकला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर जत तालुक्यातील दुष्काळी भाग ओला कशाप्रकारे करता येईल ? यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वजित कदम, राजेंद्र यड्रावकर यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकचे काही मंत्री, सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील हेही या बैठकीस उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोऱ्यातसह अलमट्टी धरणात पर्यंत पाणी वाहून जाण्यास बांधकामांचा अडथळा होत आहे. या सर्व बांधकामांचे ऑडिट करण्यासह दोन्ही राज्यात समन्वयासाठी समिती स्थापन करण्याबाबत या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. मंत्र्यांचा समावेश असलेली एक समिती, अभियंत्यांचा समावेश असलेली एक समिती आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची एक समिती अशा या तीन स्वतंत्र समित्या असणार आहेत. पूर येण्यापूर्वी महाराष्ट्र कर्नाटकातील नदीकाठच्या भागाला कशाप्रकारे अलर्ट केले जाऊ शकते, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.