Wed, Jul 15, 2020 16:03होमपेज › Satara › ‘त्यांनी’ कधीच तोंड उघडले नाही : देसाई

‘त्यांनी’ कधीच तोंड उघडले नाही : देसाई

Published On: Oct 21 2018 2:22AM | Last Updated: Oct 21 2018 12:07AMतारळे ः वार्ताहर

माजी आमदारांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून देत त्यांच्या नेत्यांचा भाग हिरवागार करण्याचे ठरवले होते. त्यासाठी बंदिस्त कॅनॉलचा घाट घातला होता. त्यामुळेच तारळी धरणातून शेतकर्‍यांना पाणी मिळावे, म्हणून त्यांनी विधानसभेसह विधानसभेबाहेर कधीही तोंड उघडले नाही, असा दावा आ. शंभूराज देसाई यांनी केला आहे.

तारळे परिसरातील शेतकर्‍यांनी आ. शंभूराज देसाई यांचा गौरव केला. त्यावेळी ते बोलत होते. माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे, उपाध्यक्ष अभिजित पाटील, कारखान्याचे संचालक गजाभाऊ जाधव, सोमनाथ खामकर, तारळेच्या सरपंच अर्चना जरग यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

आ. देसाई म्हणाले, तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी 50 मीटर हेडच्वरील शेतीला देणे हा निर्णय करुन घेणे सोपे नव्हते. पाणी वाटप आणि व्याप्तीमध्ये बदल असल्याने या निर्णयाकरिता मोठा संघर्ष करावा लागला. धरणाच्या कार्यक्षेत्रात बंदिस्त कॅनॉलचे काम सुरु झालेनंतर हे पाणी आता आपल्या हातातून जाणार, हे निश्‍चितच झाले होते. या तालुक्याच्या माजी आमदारांनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही, असे सांगत आपण शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाबाबत आपण आवाज उठवत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. पालकमंत्र्यांच्या विशेष सहकार्यामुळेच आपण हा लढा यशस्वी करू शकलो. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या 32 जिल्ह्यात 26 प्रकल्पांना प्रधानमंत्री सिचाई योजनेत सहभागी केले आहे. यात आपल्या सातारा जिल्ह्यातील 5 प्रकल्पांचा समावेश असून यात पाटणचे तीन प्रकल्प समाविष्ट आहेत, असेही आ. देसाई यांनी सांगितले.

बबनराव भिसे, युवराज नलवडे, रामचंद्र देशमुख, विकास जाधव, प्रल्हाद पवार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी यावेळी उपस्थित होते. पतंग सावंत स्वागत भाऊसाहेब जाधव यांनी केले. आभार गजाभाऊ जाधव यांनी मानले.