Sun, Jul 05, 2020 05:13होमपेज › Satara › अंधश्रध्देचे भूत सामान्यांच्या मानगुटीवर कायम 

अंधश्रध्देचे भूत सामान्यांच्या मानगुटीवर कायम 

Published On: Feb 11 2019 1:28AM | Last Updated: Feb 10 2019 11:04PM
मारूल हवेली : धनंजय जगताप 

पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे अंधश्रध्देतून युवतीचा बळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंधश्रध्देचे भूत सामान्यांच्या मानगुटीवर कायम असल्याचे या प्रकाराने समोर आले आहे. या घटनेने सुशिक्षितांच्या मानसिकतेला जबर हादरे बसले असून समाजातून सतंप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे सुशिक्षितांचा टक्का वाढत असताना दुसरीकडे अघोरी बुध्दीचा वापर थांबताना दिसत नाही. त्यामुळे अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची सुटका होणार तरी कधी हा प्रश्‍न आवासून उभा आहे. 

करपेवाडी येथे घडलेल्या घटनेने सामाजातून हळहळ व्यक्त होत असताना तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. या प्रकाराने अंधश्रध्देची पाळेमुळे अजूनही घट्ट असल्याचे उघड केले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रध्दा  संपवण्यासाठी मोठे प्रयत्न झाले व होत आहेत. मात्र तरीही अंधश्रद्धेतून घडत असलेली अघोरी कृत्ये समोर येत आहेत. त्यामुळे विज्ञानाच्या युगात समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत अजूनच अडकत चालला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समाजात अशा कितीतरी अंधश्रद्धा आहेत ज्या आपण त्याला श्रद्धेच्या नावाखाली  चालवत आलो आहोत.  विज्ञानाच्या मदतीने मानवाने अविश्‍वसनीय अविष्कार घडविले आहेत. सुर्य, चंद्र, ग्रह जणू कवेत घेतले असताना अंधश्रद्धा मात्र कायम आहेत. अनेक गावामध्ये बुवाबाजीचे प्रकार चालत आहेत. त्याला बळी पडलेले अनेक कुटुंब आयुष्यातून उद्ध्वस्त झाली आहेत. गरिबी दूर करतो, रोग दूर करतो, कुणाच्यातरी अंगात देव येतो, अशा बुवा- बाबांचा आजही सुळसुळाट आहे. मेडीकल युगात अंगारे धुपारे करून रोग बरे करून घेणार्‍यांची संख्याही मोठी आहे. एकीकडे निवडणुका दरम्यान ईव्हीएम मशीनवर संशयाची सुई व्यक्त होते. तर दुसरीकडे निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी लिंबू, गुलाल, नारळ टाकण्याचे प्रकार केले जातात. मारूल हवेली विभागात तर एक पुढारी देवाची मूर्ती खिशात घालून मतदारांच्या शपथा घेत मत मागत होता. 

मांजराच्या जाण्या - येण्यावर सुद्धा अंधश्रद्धा आहेत. घुबड, कासव, मांडूळ अशा वन्यप्राण्यांचे जीव अंधश्रद्धेत घेतले जात आहेत. आजही अनेक ठिकाणी देवाला कोंबडी, बकरी दिली जात आहेत. यावरून अंधश्रद्धेने प्राणीमात्रांनाही सोडलेले नाही. जटा वाढवणे, उतारा करणे, लिंबू, बिबे टाकणे, सुई टोचणे, करणी करणे, मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार सोडवणूक करणे आदी प्रकार सर्सास घडताना पहावयास मिळत आहेत. याला महिलावर्गासह सुशिक्षित वर्गही बळी पडत आहे. अंधश्रद्धेमुळे कोणाचे चांगले तर होतच नाही, पण पैसे आणि वेळ फुकट जातो. मानसिक त्रासही सहन करावा लागतो. वेगवेगळ्या माध्यमातून अंधश्रद्धेविषयी जनजागृती होत असते. परंतु अजून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक ओळखला जात नाही. त्यामुळे एकविसाव्या शतकातसुद्धा अंधश्रद्धेच्या जाळ्यात विज्ञान चाचपडत आहे. समाज सुशिक्षित तर होत आहे, पण अंधश्रध्देच्या विकृतींना व अघोरी कृत्यांना प्रखर विरोध करताना दिसत नाही. त्यामुळेच नरबळी सारख्या घटनांनी समाज व्यवस्था हादरून जात आहे. त्याला वेळीच पायबंद घातला नाही तर दुसरी एखादी भाग्यश्री कुठेतरी सापडल्यास दोषी कोणाला धरणार?

भोंदू बुवा- बाबा आजही समाजात राजरोस वावरत आहेत. अंधश्रध्देच्या थोतांडाचे उदात्तीकरण ही मंडळी करत आहे. गोरगरीब, परिस्थितीने गंजलेला समाज याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. अंधश्रध्देचा कायदा झाला पण त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने आणि शासन याबाबत उदासिन असल्याने आणखी किती भाग्यश्रींचा बळी जाणार याबाबत विचारी समाजमन भयभीत आहे.