Tue, Jul 14, 2020 03:28होमपेज › Satara › विनोद तावडे यांचे ‘ते’ वक्तव्य चुकीचे

विनोद तावडे यांचे ‘ते’ वक्तव्य चुकीचे

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 10 2018 9:11PMकराड : प्रतिनिधी

ना. विनोद तावडे यांचे शिक्षक भरतीस वेळ लागत असल्याचे वक्तव्य अयोग्यच आहे. वास्तविक, शिक्षण संस्था महामंडळाची बाजू न्यायालयास पटल्याने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला दोन वेळा स्थगिती देण्यात आल्याचा दावा शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी केला आहे.

शिक्षण क्षेत्रात ना. विनोद तावडे शिक्षणमंत्री व त्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी गेली 4 वर्ष अक्षरश: अनागोंदी माजवून सर्वांच्याच शिक्षणाचे वाटोळे करण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. सातार्‍यामध्ये ना. तावडे यांनी शिक्षण संस्था उच्च न्यायालयात गेल्यामुळे शिक्षण भरतीस उशिर लागत आहे असे वक्तव्य केले. हे वक्तव्य अतिशय भंपक आहे. 

शासनाने शिक्षण व कर्मचारी भरती ही शिक्षण संस्थांचा अधिकार असताना तो नाकारून शिक्षक भरती शासनच करणार, असा हट्ट धरून शासकीय स्थरावर निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे खाजगी शिक्षण संस्थांनी याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी होऊन शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे भरतीस 30 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली होती. 30 ऑगस्टला याचिकेवर फेर सुनावणी होऊन शासनाच्या शिक्षक भरतीस 29 सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

केवळ टीईटीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांची भरती शासनास करता येणार नाही. संस्थेच्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही व फक्त गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती करता येणार नाही, असे म्हणणे शिक्षण संस्थांकडून मांडण्यात आले आहे. या संदर्भातील विविध राज्य शासनाच्या विरोधातील सर्वोच्य न्यायालयाच्या निकालांचे व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे दाखले उच्च न्यायालयात महाराष्ट राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिले होते, असेही अशोकराव थोरात यांनी सांगितले आहे.

शासनाने शिक्षण संस्थांच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये. अनेक वर्ष शिक्षक भरती न झाल्याने अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण संस्थांचीच बाजू योग्य असल्याचे शासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. - अशोकराव थोरात, उपाध्यक्ष, शिक्षण संस्था संघ