पाटण : गणेशचंद्र पिसाळ
एकेकाळी कोयनेचे शासकीय विश्रामगृह तथा चेमरी हे राज्यातीलच नव्हे तर केंद्रीय मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी निवासाबरोबरच प्रतिष्ठेचे स्थान होते. राज्याच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय याच ठिकाणाहून घडले. कोयना प्रकल्पाशी निगडीत अनेक हितकारी मोहिमा येथूनच फत्ते झाल्या. मात्र हेच विश्रामगृह गेल्या काही वर्षात खिळखिळे झाले आहे.
मंत्री, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे फिरवलेली पाठ त्यामुळे याचा कोयनेच्या विकासावर दुष्परिणाम झाला. कोयनेच्या सार्वत्रिक हिताची मुहूर्तमेढ ही याच विश्रामगृहातून रोवली गेली. सातत्याने येथे मान्यवर मंत्री, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकार्यांची ऊठबस असल्याने कोयना केंद्रस्थानी होते.
राज्यातील महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय, योजना, उपक्रम यासाठी शासकीय आढावा, नियोजन व अंमलबजावणीसाठीचे निर्णय याच ठिकाणाहून झाले. त्यामुळे धरणाच्या भिंतीलगतचा हा निसर्गरम्य परिसर कायमच स्वच्छ, सुंदर व निटनेटका असायचा. येथे रहायला संधी म्हणजे राजेशाही थाट तसेच प्रतिष्ठेचा मानला जायचा.
कोयनेच्या प्रशासकीय व राजकीय ग्रहणाचा हे विश्रामगृह देखील बळी ठरले. चार वर्षात येथे येणार्या मान्यवरांची संख्या कमी झाली. याच कोयनेतील महत्वपूर्ण शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली. त्यामुळे महत्वाच्या वरिष्ठ अधिकार्यांनीही याकडे पाठ फिरवली. सुरूवातीला नुतनीकरणाचे गाजर दाखवत प्रशासनाने निवास व्यवस्था बंद करत आणली. टप्प्याटप्प्याने मग अधिकारी, कर्मचारी किंवा अन्य कामगारही येथून बाजूला काढले. नुतनीकरण काही झालेच नाही. शिवाय सातत्याने बंद असल्याने मग या इमारतीत सडल्या व गंजल्याही. आतील फर्निचरही खिळखिळे झाले. आता तर हे विश्रामगृह व येथील प्रशासकीय व्यवस्था ही अक्षरशः मृत्यू शय्येवर शेवटच्या घटका मोजत आहे.
वास्तविक हे विश्रामगृह कोयनेच्या सार्वत्रिक प्रगतीचे केंद्रबिंदू होते. या ठिकाणाहून राबविण्यात येणारी शासकीय ध्येय धोरणे राजकीय दबदबा ठरत होते. त्यामुळे कोयनेला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी येथूनच सुरूवात झाली तर नव्याने क्रांती होईल आणि कात टाकून हीच कोयना पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करेल.