Tue, Jun 15, 2021 12:10होमपेज › Satara › पाऊस येतो धावून, रस्ते जातात वाहून

पाऊस येतो धावून, रस्ते जातात वाहून

Published On: Oct 02 2019 1:59AM | Last Updated: Oct 01 2019 8:43PM
कराड : प्रतिभा राजे

पावसामुळे कराडमधील रस्ते पुन्हा दलदलीत अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कोल्हापूर नाका, मिनार्ती मंगल कार्यालय परिसर, सुपर मार्केट, कार्वेनाका, स्टेशन रोड, कृष्णा नाका, विजय दिवस चौक परिसरातील रस्त्यांची अवस्था भयावह झाली आहे.  

कोल्हापूर नाक्यापासूनच रस्ता जागोजागी खचलेला आहे त्यामुळे रस्त्याचा निकृष्ट दर्जा पावलोपावली दिसून येतो. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने वर्षभरातच वरच्या रस्त्याच पापुद्रा निघून जुना रस्ता वर आला आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिगळे लावलेली दिसून येत आहेत.  शिवाजी हायस्कूल ते स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय या ठिकाणचा रस्त्यांवर खड्ड्यांची माळ आहे. त्यामुळे वाहनधारक, पादचारी पडून जखमी होत आहेत. रस्त्यावर सर्वत्र खडी निघाल्याने वाहनधारक खडीवरून घसरत आहेत.  तसेच 24 बाय 7 या योजनेसाठी उकरण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्याचा दर्जा लक्षात आल्यावर रस्ता पूर्णपणे उखडून काढून पुन्हा नव्याने करावयास होता मात्र केवळ मुलामा टाकल्याने रस्त्याची अवस्था गंभीर बनली आहे.

 

ईदगाह भेदा चौक ते ईदगाह मैदानापासून साईबाबा मार्गाने बसस्थानक व स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातील वाळू व खडी इतरत्र विस्कटल्याने त्यावरून वाहने घसरत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने 100 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून आणला होता. त्यामध्ये विविध विकासकामांबरोबरच कराडच्या मुख्य रस्त्यासाठी 11 कोटी रूपयांचा निधी  देण्यात आला होता.

या निधीतून तयार करण्यात आलेला हा रस्ता वर्षभरात खचला आहे, रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. जुन्या रस्त्यावरच मुलामा दिल्याने वरच्या मुलाम्याचा थर निघून रस्त्यावर ठिगळ लावल्यासारखी रस्त्याची अवस्था झाली आहे. मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यावर तर अनेक ठिकाण खुदाई करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांतून संतप्‍त भावना निर्माण होत असून केवळ स्वच्छता नको समस्यांचाही निपटारा करा, अशी  मागणी नागरिकांतून होत आहे. 

पावसाच्या फटक्यात पॅचिंगचे तीनतेरा

नागरिकांनी तक्रार केली की पालिका तात्पुरत्या स्वरूपात पॅचिंग करते मात्र अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे हे पॅचिंग धुवून जात आहे. तसेच पाऊस नाही पडला तर ये — जा करणार्‍या वाहनांमुळे या पॅचिंगची माती रस्त्यात विखुरत आहे. त्यामुळे या तात्पुरच्या पॅचिंगचा काहीच उपयोग होत नाही. याउलट उखडलेल्या पॅचिंगच्या मातीमुळे ये — जा करणारी वाहने घसरत आहेत. 

पालिका समस्यांकडे नव्हे तर केवळ सुशोभीकरणाकडे लक्ष देत आहे. नागरिकांना ज्याची जास्त आवश्यकता आहे अशा गोष्टी दुरूस्ती करणे आवश्यक असताना पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरातील रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांचे मणके ढिले करत असताना पालिकेने रस्त्यांकडे लक्ष द्यावे. 
    - आनंदराव लादे, जिल्हाध्यक्ष, भीमशक्‍ती संघटना