Mon, Jul 13, 2020 12:29होमपेज › Satara › वासोटा शिवरायांच्या काळातील तुरुंग

वासोटा शिवरायांच्या काळातील तुरुंग

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:12PMकराड : अमोल चव्हाण

डोक्यावर सूर्य असतानाही सुर्यप्रकाश जमिनीवर पडत नसेल असे घनदाट जंगल, झाडाझुडपांनी वेढलेले अतिशय निर्जन ठिकाण तसेच वाघ, बिबट्या यासह जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासोटा किल्ल्याचा वापर हा ‘तुरुंग’ म्हणून केला जात होता. इंग्रज अधिकार्‍यांना अटक करून तर काहींना कैदी म्हणून येथे ठेवल्याची नोंद आहे. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले होते. येथील दुर्गम परिसराची पेशवाईतही नोंद आहे. 

वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता व साहसाची अनुभूती देणारा किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्‍वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. कोयना नदीवर धरण बांधलेले आहे. या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय म्हणतात. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरले असून ते वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे.

पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्‍चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. वसिष्ठचे पुढे वासोटा झालं असावेे, असे बोलले जात आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी दि. 6 जून 1660 रोजी वासोटा किल्ला घेतला.

अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी  सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. मात्र, त्यांनी तो सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व दुर्गम अशा वासोट्या किल्ल्यावर त्याला ठेवले. सन 1661 मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळेचे वासोटा किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असल्याचे स्पष्ट होते.