Wed, Aug 12, 2020 13:09होमपेज › Satara › ऊसतोड कामगारांना मायभूमीची ओढ

ऊसतोड कामगारांना मायभूमीची ओढ

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 08 2019 8:36PM
सातारा : मीना शिंदे 

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली की उसाची कमतरता भासू लागते. त्यामुळे कारखाने बंद पडण्याचा हा हंगाम असतो. आता एप्रिल महिना सुरू झाला असून पहिला आठवडा संपला आहे. उसाचे क्षेत्र संपल्यामुळे जिल्ह्यातील 15 पैकी 11 कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसतोड कामगारांनी आता परतीची वाट पकडली आहे. तर उर्वरित चार कारखाने अजून काही दिवस चालल्यानंतर तेथील कामगारही घरी जाण्याची शक्यता आहे. 

दिवाळीला जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांची धुरांडी पेटली होती. त्यानंतर तब्बल पाच महिने बॉयलर पेटलेले होते. मात्र, जस जसा कालावधी लोटत गेला तस तसा ऊस तोडीचे प्रमाण वाढत होते. उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या की बहुतांश कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपतो. त्यामुळे कारखाना बंद केला जातो. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्याने ऊसतोड कामगार बिर्‍हाडांची घरवापसी  सुरु झाली आहे. या कारखाना कार्यक्षेत्रातील बीड, नगर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कुटुंबियांसह  परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

मुबलक ऊस उत्पादनामुळे गेल्या वर्षी जिल्ह्यात साखर कारखान्यांमधून शंभर लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादनाचा विक्रम केला होता. यावर्षी देखील साखर उत्पादन विक्रमीच असले तरी गाळप हंगाम मात्र लवकरच संपला आहे. पाणी टंचाई, एफआरपी याशिवाय अन्य कारणांनी उसाआभावी यावर्षी हंगाम लवकर संपला आहे. तर कृष्णा सहकारी साखर कारखाना, अजिंक्य सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर वर्क्सव खटाव-माण या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप सुरु आहे. 

ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर बीड, नगर जिल्ह्यातील ऊस तोड कामगार आपल्या मायभूमीपासून दूर झाले होते. या सहा महिन्यात काबाडकष्ट केल्यानंतर पुन्हा आता उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या गावी रवाना झाले आहेत. भीषण दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे  ओढवलेली आर्थिक ओढाताण अशा कारणांमुळे हे ऊसतोड  मजूर साखर पट्ट्यात स्थलांतरीत होवून गाळप हंगाम संपेपर्यत काम करत असतात. 

घरचे वयोवृध्द, मुलांची शाळा, जनावरे अशा एक ना एक समस्यांना तोंड देऊन हे कामगार स्थलांतरीत झालेले असतात. येथे काबाडकष्ट करून पुढील अडचणींना तोंड देता यावे. मुलांच्या भविष्यासाठी चार पैसे गाठीला असावे यासाठी त्यांचा हा संघर्ष सुरू असतो. 

गाळप हंगाम सुरु होताच पाच ते सहा महिने ऊस तोड करतात. साखर कारखान्याचा पट्टा पडला की या मजूरांना मायदेशी जाण्याची ओढ लागते. कारखानदार व  मुकादम यांचा हिशोब झाली की सामानाची बांधाबाध करुन आपल्या मायदेशी परतीचा प्रवास सुरु हातो. दरवर्षीच्या मानाने  यावर्षी अनेक साखर कारखान्यांचा लवकरच  गाळप हंगाम   संपला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे ऊसतोड मजूर लवकरच मायदेशी परतणार आहेत. 

उन्हाळ्यात चारा छावण्यांचा आसरा

बीड जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता मोठी आहे. याच जिल्ह्यातून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे ऊसतोड कामगार येत असतात. आता साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. त्यामुळे कामगारांना गावाची ओढ लागली आहे. परंतु, गावांमध्ये दुष्काळ भीषण असल्याने अनेकांची गावाकडे जाण्याची इच्छाच होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पाण्याची भीषणता असल्याने अनेक कामगारांनी कारखाना कार्यक्षेत्रातच राहण्याचा निश्‍चय केला आहे.  दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर बीड जिल्ह्यात 43 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून  जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्‍न मिटणार असल्याने अनेक ऊसतोड मजूर आपल्या जनावरांसह या छावण्यांचा आसरा घेणार आहेत.