होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात बाधित व मृतांचा टक्का वाढतोय

सातारा जिल्ह्यात बाधित व मृतांचा टक्का वाढतोय

Last Updated: Jun 01 2020 10:44PM
सातारा : महेंद्र खंदारे

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल झाल्याने गेल्या काही दिवसांत कोरोना मीटर झपाट्याने वाढला आहे. आतापर्यंत प्रशासनाने 6 हजार 399 जणांच्या टेस्ट केल्या असून त्यातील 538 जण बाधित आले आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण हे 8.40 टक्के झाले आहे. बाधितांबरोबर मृतांचा टक्काही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मृतांचे प्रमाण ही अवघे दीड टक्के हे आता 4 टक्क्यांवर जाऊन पोहचले आहे. ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा असून मुंबईकरांना आवरण्यासाठी उपाय योजनांची गरज भासू लागली आहे. 

कोरोनाचे जगभर थैमान सुरू आहे. दिवसागणिक नव्हे तर सेकंद आणि मिनिटागणिक कोरोना रूग्णसंंख्या अपडेट होत आहे. देशामध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक 65 हजारांहून अधिक कोरोनाचे रूग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, अकोला, जळगाव, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद ही महानगरे वगळल्यानंतर सातार्‍यातच सर्वात जास्त बाधित आहेत. राज्यात आता सातारा जिल्ह्याची वाटचाल टॉप 10 च्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. 

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंबईमधील चाकरमानी हे गावाकडे परतले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत 3 लाखांहून अधिक शहरी बाबू विविध गावांमध्ये आले आहेत. त्यांच्यापासून कोरोना संसर्गाचा धोका असल्याने गावानेही दक्षता बाळगली आहे. परंतु, शहरीबाबूंकडून नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्यानेच जिल्ह्यात 500 हून अधिक कोरोनाग्रस्त रूग्ण झाले आहेत. 

दिवसेंदिवस कोरोना टेस्टचे प्रमाण वाढल्यानेही कोरोनाग्रस्त वाढत चालल्याचे चित्र देश, राज्यासह सातारा जिल्ह्यातही आहे. 1 जून 2020 पर्यंत देशात 38 लाख 37 हजाजर 207 जणांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 1 लाख 90 हजार 535 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. हे प्रमाण टेस्टच्या तुलनेत 5 टक्के आहे. यातील 91 हजार 801 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट हा 48.19 टक्के आहे. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 5 हजार 394 मृत्यू झाले असून मृत्यू दर हा टेस्टच्या तुलनेत 2.83 टक्के आहे. 

आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत 4 लाख 62 हजार 176 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. यामध्ये 67 हजार 655 जण पॉझिटिव्ह आले आहेत. टेस्टच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण हे 14.63 टक्के आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. याचबरोबर राज्यात 29 हजार 329 जण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट हा 43.35 टक्के आहे. तर 2 हजार 286 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा दर राज्यात 3.37 टक्के एवढा राहिला आहे. 

सातारा जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांचा आकडा वेगाने वाढल्याने सर्वच पातळ्यांवर सातारा जिल्हा आता टॉप टेन च्या दिशेने जावू लागला आहे. जिल्ह्यात एकूण 6 हजार 399 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 538 जण पॉझिटिव्ह सापडले असून टेस्टच्या तुलनेत हे प्रमाण 8.40 टक्के एवढे आहे. तर 300 जण मुक्त झाले असून हे प्रमाण 37  टक्के आहे. जिल्ह्यात मृतांचा आकडा 21 वर पोहचला आहे. टेस्टच्या तुलनेत मृतांचा टक्का हा 4 टक्क्यांवर गेला आहे. 

सातारा जिल्ह्याची ही आकडेवारी प्रशासनाला धडकी भरवणारी आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढू लागल्याने आता शासकीय हॉस्पिटल्स अपुरी पडू लागली आहे. प्रशासनाकडून हॉस्पिटल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी यासाठी तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे. 

त्याचबरोबर जिल्ह्याच्या सर्वच चेकपोस्टवर येणार्‍या नागरिकांची तपासणी करून त्यांचे स्थानिक पातळीवर अलगीकरण केले पाहिजे. अन्यथा सातार्‍याचा औरंगाबाद, मालेगाव किंवा सोलापूर होण्यास वेळ लागणार नाही.