Fri, Sep 18, 2020 18:55



होमपेज › Satara › सातार्‍यात येड्यांची जत्रा

सातार्‍यात येड्यांची जत्रा

Last Updated: Mar 30 2020 12:45AM

लॉकडाऊन असतानाचे हे साताऱ्यातील चित्र



सातारा : हरीष पाटणे 

पाहिलात ना फोटो? झालं ना काळीज चर्रर्र..! अहो ही मुंबई नाही, पुणे ही नाही, हा आपला साताराच आहे. शेजारच्या पुण्यात, इस्लामपुरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना या ‘येड्यांच्या गर्दीला’ त्याचे सोयरसुतक नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री, सातारा जिल्हा प्रशासन घसा ओरडून ‘घरात बसा’ सांगत आहे, सोयीसुविधा जागेवर पुरवत असताना ‘सोशल डिस्टन्सिंग’ मंडईच्या कोपर्‍यात मारून ही जत्रा कोरोनासारखा महाभयानक आजार आपापल्या घरात घेऊन जाईल की काय? एवढे भयावह चित्र निर्माण झाले आहे. गर्दी केल्यानंतर पोलिसांनी फटकावले तर मानवी हक्‍काच्या नावाने गळा काढणारे कोरोना झालेल्यांना वाचवायला येतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.  

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुण्यातील लोकही आता गावाकडे आले आहेत. तिसर्‍या टप्प्यात मोठा धोका संभवत आहे. शेजारच्या पुण्यात व लगतच्या इस्लामपुरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सातारा पुणे व इस्लामपुरापासून किती दूर आहे? मुळात इस्लामपुरातल्या भोजनाला सातारा जिल्ह्यातील काहींनी हजेरी लावली होतीच. त्यांच्या संपर्कात आलेले संशयाच्या भोवर्‍यात आहेतच. कधी स्फोट होईल सांगता येणार नाही. असे असताना सातार्‍यासारख्या शांत शहरात समजदार माणसांनीच गर्दीचा उच्छाद मांडावा याबाबत संताप व्यक्‍त होत आहे. 

पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हा प्रशासन उगीचच लॉकडाऊन करायला लावत आहेत का? संभाव्य धोके आहेत म्हणूनच संचारबंदी लागू आहे. मात्र, सातार्‍यात संचारबंदीचे काही येड्यांनी तीनतेरा वाजवले आहेत. जणू खायचे वांदे झाले असल्यासारखी सगळी जत्रा सकाळी सकाळी मंडईत जाऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने किराणा दुकानदारांचे, भाजीपाला पुरवणार्‍या विक्रेत्यांचे नंबर पाठवले आहेत, घरपोच सेवा सुरू केली आहे. असे असताना मूर्खाचा बाजार असल्यासारखे काही बोंबलभिके वागत आहेत. अशा मुठभरांमुळे खरोखर नियम पाळणारेही गोत्यात येणार आहेत. पोलिसांना दमबाजी, मास्क लाव म्हटले तर अरेरावी करणार्‍यांना वठणीवर आणावे लागेल. सातार्‍यात आधीच दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. संशयित दिवसेंदिवस वाढत आहेत. सातार्‍यातील हॉस्पिटल सेवा फारशी समाधानकारक नाही. अशा परिस्थितीत काही मोजक्या टोळक्यांमुळे, बेअक्‍कल व्यक्‍तींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव सातारा जिल्ह्यात वाढला तर खाटा पुरणार नाहीत, याचे गांभीर्य संबंधितांनी ठेवायला हवे. कोण तरी फुटकळ तक्रार करतो म्हणून पोलिसांनीही डोळ्यावर पट्टी ठेवू नये. गृहमंत्र्यांनी लाठी हातात घेण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाने मरण्यापेक्षा एखादा रट्टा मारला तर फारसे बिघडण्याचे आणि कुणाचा पोटशूळ उठण्याचे कारण नाही. सातार्‍याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आक्रमक होण्याची गरज आहे. उद्या संख्या वाढली तर सातार्‍याचे सिव्हिल हॉस्पिटल तेवढ्या पात्रतेचे नाही. त्यामुळे आताच पोलिसांनी व प्रशासनाने गर्दीवर हंटर चालवण्याची गरज आहे. प्रशासन काय जाणीवपूर्वक कोणाला चोपत नाही. ज्यांनी संचारबंदी फाट्यावर मारली आहे त्यांच्या बुडावर रट्टा बसलाच पाहिजे. कोरोनाचा हाहाकार माजला तर हेच बेंबटे पोलिस व प्रशासनाच्या नावाने दोन्ही हाताने बोंब मारतील. त्यामुळे छायाचित्रात दिसत आहे तशी गर्दी सातारा जिल्ह्यात कुठेही दिसता कामा नये याची प्रशासनाने खबरदारी  घेतली पाहिजे. त्याचवेळी शहाण्या नागरिकांनी अशा येड्यांना त्यांच्या भाषेत सुनावले पाहिजे. नाही तर हा खुळ्यांचा बाजार सातार्‍याची संपूर्ण वस्ती उठवून बसवेल याची सगळ्यांनीच नोंद घ्यावी, असा इशारा या गर्दीच्या कोलाहोलातच परिस्थितीने उपस्थित केला आहे. 





 







"