Sat, Jul 11, 2020 14:44होमपेज › Satara › शंभर नंबरी बुलेट आणि नेताही 

शंभर नंबरी बुलेट आणि नेताही 

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 10:45PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ  

राज्यात, केंद्रातच न्हवे तर अगदी पाटण तालुक्यातही येणार्‍या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल अंदोलनाला पाटण तालुक्यातील तरूणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील या मोटारसायकल रॅलीमध्ये हजारो दुचाकी आणि दुप्पट तरूणांनी शासनाविरूद्ध हा बुलंद आवाज उठविल्याने येथे परिवर्तनाकडे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

राज्यातील देवेंद्र फडणवीस व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व तालुक्यातील आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाटण येथे हल्लाबोल अंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने यावेळी तरूणांनी मोठा सहभाग घेतला होता. तरूणाईमधला शासनविरोधी रोष यावेळी उफाळून आला होता. येथे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील निसरे फाटा ते पाटण अशी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये स्वतः सत्यजितसिंह पाटणकर यांनी भर उन्हातही निसरे ते पाटण बुलेट चालवत याचे नेतृत्व केले. कराड चिपळूण रस्त्यावर गावोगावी या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करत हा उत्साह पाटणपर्यंत वाढतच गेला.

तसेच या रॅलीमध्ये माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, विधानपरिषद आ. नरेंद्र पाटील, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, आदी मान्यवर यात सहभागी झाल्याने या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली होती. 

सातत्याने सत्तेत राहिलेल्या पाटणच्या राष्ट्रवादी तथा पाटणकर गटाच्या या हल्लाबोल आंदोलनाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. त्यामुळे हे आंंदोलन यशस्वी करण्याची प्रमुख जबाबदारी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर होती. त्यांनी निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी केले. निश्‍चितच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला मात्र त्यानंतरच्या बाजार समिती, नगरपंचायत, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी निवडणुकात येथे राष्ट्रवादीला अनपेक्षित यश मिळवून देणार्‍या सत्यजितसिंह पाटणकर यांची या हल्लाबोल आंंदोलनातील रॅलीमध्ये शंभर नंबरची बुलेट व नेताही शंभर नंबरी अशा खुमासदार चर्चा सध्या येथे सुरू आहेत. 

 

Tags : satara, Patan, Patan news, Satyajejitsinh Patankar, motorcycle rally, ncp hallabol aandolan,