Mon, Aug 10, 2020 04:26होमपेज › Satara › नळाला मोटर लावल्यास फौजदारी

नळाला मोटर लावल्यास फौजदारी

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:55PM

बुकमार्क करा

सातारा: प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक 12 मध्ये विविध भागामध्ये नळ कनेक्शला थेट विद्युत मोटारी लावल्या जात असल्याने पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जो कोणी नागरिक नळ कनेक्शनला थेट विद्युत मोटर लावेल अशांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवार व बुधवार पेठेत नवीन जलवाहिनी चाचणीचे काम सुरू असल्याने दूषित पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागारिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक 12 मध्ये पालिकेमार्फत पाणी सोडल्यास काही नागरिक नळ कनेक्शनला थेट विद्युत मोटर लावत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. घोरपडे टाकीच्या माध्यमातून राजसपुरा, गुरूवार पेठ व शेटे चौक ते कमानी हौद परिसर, वेलणकर बोळ, गुरूवार परज या परिसरात पाणी सोडल्यानंतर कोणीही विद्युत मोटर लावून अतिरिक्‍त पाणी उपसा करू नये.

जर कोणी नळ कनेक्शनला विद्युत मोटर लावली असेल त्यांची मोटर जप्‍त करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याच्या वेळेमध्ये नळ कनेक्शनला थेट विद्युत मोटर लावू नये, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपाध्यक्ष राजू भोसले, सभापती सुहास राजेशिर्के व मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.

दरम्यान, कोटेश्‍वर टाकीच्या माध्यमातून पाणी पुरवठा होणार्‍या शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ व बुधवार पेठ येथे नवीन जलवाहिन्याच्या चाचणीचे काम पालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी तांत्रिक बाबी व दोष पूर्ण होईपर्यंत पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे. दोन दिवसाआड नवीन जलवाहिनीद्वारे चाचणी घेत असताना नळांना तोट्या नसल्याने काही नळ कनेक्शन गटारालगत असल्याने गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे.

निळ्या जलवाहिनीद्वारे सोडण्यात येणारे पाणी योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी तांत्रिक कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. तरी या भागातील नागरिकांना त्यांना पुरवठा करण्यात येणार्‍या पाण्यामुळे आरोग्यास कसलाही धोका पोहचू नये. यासाठी निळ्या किंवा जुन्या जलवाहिनीचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असेही पालिकेमार्फत कळवण्यात आले आहे.