Tue, Jul 14, 2020 07:15होमपेज › Satara › कंटेनरखाली चिमुकली चिरडली

कंटेनरखाली चिमुकली चिरडली

Last Updated: Nov 06 2019 8:45AM
कराड ः प्रतिनिधी

कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने 9 वर्षांची चिमुकली कंटेनरखाली चिरडली असून, ती जागीच ठार झाली. तर, तिचे आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवार दि. 5 रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका, कराड येथे हा अपघात झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने कंटेनरच्या काचा फोडल्या. 
सोनाक्षी सतीश शेटे (वय 9, रा. कुंभारगाव, ता. पाटण) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर, तिचे आजी-आजोबा तानाजी शंकर खराडे (वय 60) व रुक्मिणी तानाजी खराडे (50, दोघेही रा. कालेटेक, ता. कराड) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तसेच विक्रम शंकरलाल  विष्णोदी (वय 27, रा. जोधपूर-लांभा, राजस्थान) असे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. ढेबेवाडी बाजूकडून तसेच आगाशिवनगर परिसरातून कराड शहरात येण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरून महामार्ग ओलांडून लोकांना प्रवास करावा लागतो. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खराडे दांपत्य आपल्या मुलीची मुलगी सोनाक्षी शेटे हिला घेऊन कराड शहरात येत होती. 

दरम्यान, कोल्हापूर नाका येथे कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे निघालेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल काही फूट अंतर फरपटत गेली. त्यामध्ये आजी आजोबा गंभीर जखमी झाले तर चिमुकलीच्या अंगावरुन कंटेनरचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. अपघात एवढा भयानक होता की बघणार्‍यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तर सतंप्त जमावाने कंटेनरच्या काचा फोडल्या.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कराड शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे पोलीस कर्मचारी खलील इनामदार व प्रशांत जाधव हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जमलेली गर्दी पांगवली. तसेच चालकासह कंटेनरला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर अपघातप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.