Wed, Aug 12, 2020 21:02होमपेज › Satara › सातारा जिल्हा ‘कोरोना’च्या पहिल्या टप्प्यावर

सातारा जिल्हा ‘कोरोना’च्या पहिल्या टप्प्यावर

Last Updated: Mar 25 2020 10:14PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यावर असताना सातारा जिल्ह्याने पहिल्या टप्प्यावर प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील दोघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून या दोघांनीही परदेशवारी केली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींनाच कोरोना संसर्ग झाला असून त्यांच्यापासून अन्य कुठल्याही व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला नसल्याची तूर्त शक्यता आहे. ‘कोरोना’ला पहिल्याच टप्प्यावर रोखण्याचे आव्हान जिल्हावासीयांसमोर ठाकले असून त्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. चीनमधून आलेल्या या विषाणूचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकारे करत आहेत. सातारा जिल्ह्यातही  प्रशासनाकडून गेल्या चार-पाच दिवसांपासून उपाययोजना केल्या जात आहे. राज्यातील प्रमुख शहरांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना सातारा जिल्हा त्याला अपवाद ठरला होता. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दृष्टीने राज्याने तिसरा टप्पा गाठला असताना सातारा जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र, दुबईहून प्रवास करून आलेल्या 45 वर्षीय महिलेच्या स्रावाचे नमुने सोमवारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर रात्री उशिरा एका पुरुषालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रिपोर्ट आले. या रुग्णाने कॅलिफोर्नियातून प्रवास केला होता. जिल्ह्यात कोणताही रुग्ण सापडला नव्हता; मात्र आता जिल्ह्यात 2 कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. कोराना विषाणू संसर्गाच्या बाबतीत जिल्हा पहिल्या टप्प्यावर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसमोर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे. 

हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती प्रयत्न करत आहेत. मात्र, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा सेवेसाठी घराबाहेर पडणार्‍या लोकांची संख्या अद्यापही मोठी आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती, संस्थांवर गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, तरीही भाजी मंडई, मेडिकल्समध्ये गर्दी दिसत आहे. शहरातील आवश्यक त्या भागात नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिल्यास ही गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. शहरात प्रत्येक प्रभागात भाजी विक्री केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. 

परजिल्ह्यातून आलेल्या लोकांनी क्यू आर कोडवरून नोंदणी करावी
परजिल्ह्यांतून स्थलांतरित होऊन सातारा जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशा स्थलांतरित लोकांचा सर्व्हे प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, अद्यापही काही जण ही माहिती दडवून ठेवत असल्याचे समोर येत आहे. गर्दी टाळण्यासाठीही काही जण नावनोंदणी करत नसल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या स्थलांतरित लोकांना घराबाहेर पडावयाचे नाही त्यांनी https://forms.gle/MKCCCVGMnxU9dwK58  या लिंकचा वापर करून आपली नावनोंदणी केल्यास त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे जिल्हा प्रशासनाला सोपे होणार आहे. त्यामुळे संबंधित स्थलांतरित नागरिकांनी नावनोंदणी करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.