Sun, Jul 12, 2020 17:12होमपेज › Satara › मुलाच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदानाचा संकल्प 

मुलाच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदानाचा संकल्प 

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 7:48PM

बुकमार्क करा

मसूर : दिलीप माने

हणबरवाडी ता.कराड येथील सैन्यदलात सेवा बजावत असलेले जवान अंकुश रामचंद्र शेडगे यांनी देशसेवेचे व्रत सांभाळत आपल्या लाडक्या बाळाच्या चि. यज्ञेशच्या  पहिल्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी व अवास्तव खर्चाला फाटा देत  सपत्निक नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यांचा हा अनोखा संकल्प इतरांनी  प्रेरणा घ्यावा असाच आहे. 

आपल्या मरणानंतर आपल्या डोळयांनी हे जग इतरांनीही पहावे असा मनोदय शेडगे पती-पत्नींनी व्यक्त केला. यापुढेही बाळाच्या प्रत्येक वाढदिनी रक्तदान शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना मदत व समाजोपयोगी उपक्रम  राबविणार असल्याचा मनोदय त्यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला. 

सैनिक हा देशाची शान आहे. त्यांच्यामुळेच तर आपण शांत झोपी जातो. ते मात्र छातीचा कोट करून रात्रंदिवस देश संरक्षणासाठी सीमेवर प्राणपणाने लढत असतात. जवान शेडगे हे सुध्दा चंदिगडहून आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गावी आले. वाढदिवसाच्या अवास्तव खर्चाला फाटा देत त्यांनी सपत्निक नेत्रदानाचा एक अनोखा उपक्रम राबवून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. शेडगे पती-पत्नीच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.