Tue, Aug 11, 2020 21:53होमपेज › Satara › अपघातात डॉक्टर कुटुंबाचा अंत

अपघातात डॉक्टर कुटुंबाचा अंत

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:29PM

बुकमार्क करा

म्हसवड : प्रतिनिधी

काळचौंडी (ता. माण) येथे ग्रामदैवताची यात्रा उरकून मुंबईला निघालेल्या कुटुंबावर रस्त्यातच काळाने झडप घातली. पुण्याजवळ जांभूळवाडी गावच्या हद्दीत त्यांच्या अल्टो कारची ट्रकला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील डॉक्टर, त्यांची पत्नी, मुलगा व चालक असे चौघेजण ठार झाले. 

अधिक माहिती अशी, मुंबई येथे चुनाभट्टी-सायन परिसरात राहणारे डॉ. यशवंत माने (वय 40) हे कुटुंबीयांसमवेत काळचौंडी गावच्या यात्रेसाठी आले होते. यात्रा झाल्यानंतर रविवारी रात्री डॉ. यशवंत माने, पत्नी सौ. शारदा (38), मुलगा ऋषीकेश (19) व चालक रामचंद्र कृष्णा सुवे (सर्व रा. चुनाभट्टी-सायन, मुंबई) हे मुंबईला जाण्यासाठी अल्टो कारमधून निघाले होते. तत्पूर्वी, मुलगी शुभांगी (मायणी, ता. खटाव) येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असल्याने तिला कॉलेजवर त्यांनी सोडले होते.

तेथून त्यांनी मुंबईचा रस्ता पकडला. मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याजवळील जांभूळवाडी गावच्या हद्दीत दरीपुलाजवळ गाडी चालवणार्‍या ऋषीकेशचे कारवरील नियंत्रण सुटले व कारने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा संपूर्ण चक्‍काचूर झाला, तर कारमधील सर्वजण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. दरम्यान, ही घटना माण तालुक्यात वार्‍यासारखी पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.