होमपेज › Satara › अर्थसंकल्पीय अधिवेशन आणीबाणीचे ठरेल 

अर्थसंकल्पीय अधिवेशन आणीबाणीचे ठरेल 

Published On: Feb 06 2019 1:47AM | Last Updated: Feb 06 2019 1:47AM
सातारा : प्रतिनिधी

देशासमोर सर्वात मोठे संकट उभे आहे ते  बुरसटलेल्या भाजप सरकारचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. केंद्र व राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच देशातील 22 पक्षांनी एकत्र येऊन लोकशाही विचारांची मोट बांधली असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.  दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असले तरी हे आणीबाणीचे अधिवेशन  ठरेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. गट-तट मोडून काढत सातारा जिल्ह्याची काँग्रेस पुन्हा एकसंध करूया, असे आवाहन त्यांनी केले. 

राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा सत्कार व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, आ. मोहनराव कदम, माजी. खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर, धैर्यशील कदम, मनोहर शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, रजनी पवार, सुनील काटकर, अ‍ॅड. विजयराव कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 1999 च्या विशिष्ट परिस्थितीनंतर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याची 2 शकले पडली. त्यावेळी सहकार चळवळीत पकड मजबूत नसल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष  कमी पडला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसची वैभवशाली परंपरा पुन्हा उभी करूयात. काँग्रेसला लहान, मोठ्या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा अध्यक्ष मिळाला आहे. पहिल्यांदाच सक्रिय नेते व्यासपीठावर आले आहेत. काँग्रेसला गतवैभव मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मेळावे घेवून कार्यकर्ते जागे करणे गरजेचे आहे. तळागाळात काँग्रेस गेल्यानंतर गांधी मैदानावर भव्य दिव्य मेळावा घेवूयात. 2014 साली  5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागली होती. आगामी निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपापसातील मतभेद बाजुला करून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. पुन्हा देशात व राज्यात काँग्रेसच्या विचारांचे सरकार आणावयाचे आहे त्यासाठी मी राफेलचा भ्रष्टाचार, शेतकर्‍यांची फसवणूक आदी मुद्दे घेणार आहे. नवीन आघाडीमध्ये नवीन संघटना बळकट केली पाहिजे. महाराष्ट्रात व देशात बहुजन समाजाच्या हिताचे सरकार आणावयाचे आहे. सर्वांनी हातात हात घालून काम करूया. जिल्ह्यात नवी काँग्रेस उभी करून आपला विजय निश्‍चित झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, भविष्यात इतिहासात नोंद होईल असा नूतन अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. जिल्ह्यात काँग्रेस कायम एक नंबर होती. प्रेमलाताई काकींच्या काळात काँग्रेसला अनेक संकटे आली त्यावेळी त्यांनी संकटावर मात करत काँग्रेसला उभारी दिली.त्यापासून काँग्रेस पक्षाची गौरवशाली परंपरा जिल्ह्यात सुरू आहे. जी लोकं काँग्रेसच्या ताकदीवर मोठी झाली त्यांनी काँग्रेससोबत प्रतारणा केली.हा जिल्हा काँग्रेसचा आहे तो पुन्हा एक  नंबरच राहणार आहे. पृथ्वीराजबाबांनी तरूण युवकाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेसने मनात आणले तर  राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करू शकतो.हा आदर्श घेवून येथून पुढे कामाला लागायचे आहे. उपदेशाचे डोस द्यायचे बंद करा, कधी तरी जमिनीवर येवून काम करा. काम करणारा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. एवढी मोठी काँग्रेस आहे, कोण म्हणतंय जिल्ह्यात काँग्रेसची ताकद नाय? कितीही मोठी लाट असू द्या, कितीही पैसा वाटू द्या, काँग्रेस काय असते हे मनोहर शिंदेंकडून शिका. काँग्रेस पक्षाची ताकद आहे आता लढायला तयार व्हा, आता बघु कुणाचा किती दम आहे. जिल्ह्यात अनेक जणांनी आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आपल्याला नक्की कुणाबरोबर लढायचे आहे हे आपल्याला कळाले पाहिजे, असेही आ. गोरे म्हणाले. 

मलकापूरच्या निवडणुकीत भाजपाने एका मताला 7 हजार तर 5 मताला 50 हजार असा पैसा वाटला पण त्याचा उपयोग झाला नाही. आता काँग्रेस पक्षात कोण नाना गटाचा तर कोण जयकुमार गटाचा हे बाजूला ठेवा.आता पृथ्वीराज बाबा हा एकच पक्ष आहे. आगलाव्यापासून प्रथम सावध रहा. खा. उदयनराजेंच्या मनातही काँग्रेस आहे. चिंता करू नका. मागील लोकसभा निवडणुकीत महाराजांचे काँग्रेसने पुढे होवून काम केले होते.सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने पुढे गेले पाहिजे. जिल्ह्यात सर्वाना बरोबर घेवून  जायचे आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायम तळी उचलायची एवढीच कामे केली आहेत. नवीन आघाडीत काँग्रेसला बरोबर स्थान मिळालेच पाहिजे. जिल्ह्यात निम्म्या जागा पक्षाला मिळाल्या पाहिजेत.काँग्रेस पक्षाचे आतापर्यंत नुकसान होत आले, आता लढाई करावी लागणार आहे. पक्षाची तोलामोलाची आणि सुसज्ज अशी इमारत उभी राहिली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्याला लढाई काय नवीन नाही. फलटण तालुक्यात 80 हून अधिक गावात बारमाही पाणी आले आता उर्वरित गावात पाणी आणण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पृथ्वीराजबाबा कराड दक्षिणमधून लढणार आणि पुन्हा  मुख्यमंत्री  होणार, असा विश्‍वासही आ.जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

आ. आनंदराव पाटील म्हणाले, आजपर्यंत काँग्रेस पक्षाला सातारा जिल्ह्याने नेहमीच साथ दिली आहे यापुढेही  जिल्हा साथ देणार आहे. भाजप सरकारची लाट होती. परंतु सातार्‍यात बालेकिल्ला ढासळला नाही. देशातील पाच राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचा झंझावात पहावयास मिळाला. सेमी फायनल जिंकली असून आता फायनलही जिंकणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षबांधणीसाठी लागेल ती मदत केली जाईल.

जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचे शिवधनुष्य उचलताना दहा वेळा विचार केला. कारण सर्वांना बरोबर घेवून जाण्याची जबाबदारी कठीण आहे. अनेक लोकांचा मानसन्मान ठेवावा लागतो. कोणीही दुखावले जाणार नाही, कमीपणा येणार नाही हा मी शब्द देतो. पक्षवाढीसाठी जे जे करावे लागेल त्याला मी कमी पडणार नाही. उद्योगाचे जाळे व्यापक उभे केले असले तरी ते बाजूला ठेवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. जिल्ह्याची जबाबदारी सर्वांनाच पेलावी लागणार आहे. काही निर्णय कटूपणे घ्यावे लागणार आहेत.काँग्रेस कार्यकर्त्यांचे रक्षण व संरक्षण केले पाहिजे. प्रसंगी संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबाच पाहिजेत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी काम केले पाहिजेे. तालुकास्तरावर गावोगावी जावून, बैठका घेवून तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे. या ठिकाणी लाखाच्यापेक्षा मोठा मेळावा घ्यायला आम्ही तयार आहोत.
विराज शिंदे म्हणाले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पदग्रहण समारंभ व  जाहीर मेळाव्यामुळे काँग्रेस कमिटीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पृथ्वीराजबाबांचे हात बळकट करावयाचे असतील तर तळागाळापर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवले पाहिजेत. काँग्रेसचे  विचार व धोरणे  माणसा माणसात रूजवली पाहिजेत.युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी धनश्री महाडीक यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास निरीक्षक प्रकाश सातपुते, बाबासाहेब कदम, प्रल्हाद चव्हाण, रविंद्र झुटींग, नंदाभाऊ जाधव,जि.प.सदस्य भिमराव पाटील, अरूण गोरे, जिजामाला नाईक निंबाळकर, बाळासाहेब बागवान व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित  होते.यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार गांधी टोपी व भला मोठा पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.जयकुमार शिंदे यांनी आभार मानले.

दुश्मन कोण हे ओळखा : आ. जयकुमार गोरे 

दुश्मन कोण आहे हे जर कळत नसेल तर बंदूक कशासाठी हवी आहे? आतापर्यंत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने खूप भोगले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद व जिल्हा बँक ही दोन महत्त्वाची शक्तिस्थाने आहेत. या दोन्ही शक्तिस्थानापर्यंत धडक मारायला पाहिजे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ताकद द्यावयाचे काम होते. ही भूमिका घेऊन काम केले पाहिजे, असेही आ. जयकुमार गोरे म्हणाले.