Sat, Oct 31, 2020 13:07होमपेज › Satara › पावसाच्या सभेचे आशीर्वाद वाया जावू देणार नाही

पावसाच्या सभेचे आशीर्वाद वाया जावू देणार नाही

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या सातार्‍यातील पावसातल्या सभेला आज वर्ष पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक सभेला उपस्थित राहून तमाम जनसमुदायाने आम्हाला दिलेले आशीर्वाद कधीही वाया जावू देणार नाही, अशी ग्वाही सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातार्‍याचे खासदार  श्रीनिवास पाटील यांनी ‘पुढारी’तील रोखठोक हे सदर वाचल्यानंतर फोन करुन ‘पुढारी’शी बोलताना दिली.

शरद पवार यांच्या सातार्‍यात झालेल्या पावसातल्या सभेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. या ऐतिहासिक सभेला दैनिक ‘पुढारी’ने उजाळा दिला. ‘जरा याद करो वो बरसात की रात’ या  रोखठोकला सातारा जिल्ह्यातील वाचकांनी व जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर दिवसभर हा लेख प्रचंड व्हायरल झाला. वर्ष पुर्तीचे  केवळ कौतुक नको तर ज्या सातार्‍यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आली त्या सातार्‍याच्या विकासाचे वांझोटेपणा घालवा, अशी आग्रही भूमिका ‘पुढारी’ने या वर्ष पूर्तीच्यानिमित्ताने मांडली. ‘ज्या मातीने राजकारणाची कूस उजवली त्या मातीच्या विकासाचे वांझोटेपण घालवा’, अशा शब्दात रोखठोकने सातारा जिल्ह्यातील जनतेच्या भावना मांडल्या होत्या. या ‘रोखठोक’चे खा.श्रीनिवास पाटील यांनीही  स्वागत केले. लेखाचे संपूर्ण अवलोकन केल्यानंतर त्यांनी थेट ‘पुढारी’ला फोन केला. 

ते म्हणाले, रोखठोकमध्ये व्यक्त केलेल्या भावना या प्रामाणिक आहेत.  सातारा जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतील सर्व घटकांना याची जाणीव आहे. त्यामुळे भविष्यात निश्चितच सातार्‍याला आणखी चांगले दिवस येतील, असेही खा. श्रीनिवास पाटील म्हणाले.

या दिवसाची आठवण म्हणून त्यांनी एक व्हिडीओही प्रसारित केला. त्यात ते म्हणाले, गेल्या वर्षी याच दिवशी सातारला आदरणीय शरद पवारांची सभा झाली. ती ज्या ज्या लोकांनी पाहिली, ऐकली त्याचे आज स्मरण होत आहे आणि त्याविषयी या व्यासपीठावरचा एक प्रतिनिधी म्हणून मला त्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. ती सभा, तो प्रसंग, ते वातावरण मला आजही जसेच्या तसे आठवते. त्यावेळी राष्ट्रवादीतून अनेक आमदार, खासदार तालुकाप्रतिनिधी यांनी राष्ट्रवादीचे जहाज बुडणार या कल्पनेने पळ काढला. एकच दुर्दम्य विचार असलेला माणूस हे जहाज हाकत होता.  त्याचे नाव शरद पवार. दि. 18 ऑक्टोबर 2019 पूर्वी कराडला अमित शहांची आणि सातारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्यावेळी शरद पवार यांच्या बरोबरचा कोणीच उरला नाही, अशा प्रकारची भाषा करण्यात आली. मल्हारपेठची सभा 18 तारखेला सायंकाळी सुरू होती. त्या सभेतच पावसाची भुरभूर सुरू झाली आणि सातारला जाईपर्यंत कदाचित पाऊस मोठा आला तर सभेत लोक उरतील का नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. पण पवारसाहेबांच्यावर असलेल्या प्रेमामुळे त्या भरपावसातही लोक त्यांच्या आगमनाची वाट पहात होते. पवारसाहेब व्यासपीठावर आले. टाळ्यांचा कडकडाट झाला. काहींनी खुर्चा डोक्यावर घेतल्या होत्या. त्यांची उगवती वाणी, त्यांचे धुरंदर भाषण आणि झालेली चूक सुधारण्याची संधी हे त्यांचे आव्हान लोकांना पटले. मी तेथेच उभा होतो. 60 वर्षांच्या मैत्रीत आपला मित्र आपल्यासाठी आव्हान करतोय आणि सातारी जनता त्याला भरभरून प्रतिसाद देते, हा माझ्या दृष्टीने आनंदाचा प्रसंग आहे आणि म्हणून आजच्यादिवशी त्या दिवसाचे वर्णन करणे आणि सांगणं त्याचा एक साक्षीदार म्हणून मला हे सांगतांना आनंद होत आहे. खरंतर भारावलेल्या वातावरणात आम्ही सगळे जण उभे होतो आणि साहेबांच्या शब्दाचा धबधबा पावसासारखा पडत होता, असेही श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केले.

विकासात महाविकास आघाडी कमी पडणार नाही : आ. शशिकांत शिंदे

पावसातल्या सभेचे रोखठोक आ. शशिकांत शिंदे यांनी बारकाईने वाचले. त्यानंतर ‘पुढारी’ शी बोलताना ते म्हणाले, खा. शरद पवार यांच्या सातारच्या ऐतिहासिक सभेला वर्षपूर्ती झाली. त्याबाबत दैनिक ‘पुढारी’ने जे रोखठोक मांडले आहे त्याला तोडच नाही. लेखणीतून त्या दिवसाचे वास्तव समोर आले आहे. रोखठोक वाचताना तो दिवस  आजच असल्याचा भास निर्माण होत आहे. खा. शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. आम्ही सातारा जिल्ह्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 "