Mon, Aug 03, 2020 14:41होमपेज › Satara › कृषी क्षेत्रापासून आर्थिक मंदीची सुरुवात

कृषी क्षेत्रापासून आर्थिक मंदीची सुरुवात

Last Updated: Oct 17 2019 1:33AM
कराड ः प्रतिनिधी

देशात आर्थिक मंदीची सुरुवात कृषी व ग्रामीण भागात दोन वर्षापूर्वी झाली. ती हळूहळू विविध क्षेत्रात पसरले असून आज संपूर्ण देश मंदीचा सामना करत आहे. कृषिक्षेत्रात सुरू झालेली मंदी नंतर बांधकाम क्षेत्रात आली व त्यानंतर आता मोठमोठे उद्योग व ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आल्याने त्याचा रोजगारावर परिणाम झाला आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.

कराड येथे फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॉसी यांच्या वतीने आयोजित ‘भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, विजय दिवाण, रमाकांत खेतन आदी प्रमुख उपस्थित होते.

यशवंत सिन्हा म्हणाले, सध्या महाराष्ट्रात निवडणुका सुरू असून माझा या निवडणूकांशी काहीही संबंध नाही. तत्त्वाच्या आधारावर जे वास्तव आहे त्यावर भाष्य करणार आहे. सध्या देशावर आलेल्या मंदीच्या संकटाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु, सुमारे पंचवीस महिन्यांपूर्वी कृषी क्षेत्रात प्रथम मंदीची सुरुवात झाली. त्यावेळीच भविष्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबत मी लेख लिहिला होता. त्या लेखामधून बोध घेतला जाईल असे वाटले होते. परंतु तसे न होता उलट माझ्यावरच आरोप करण्यात आले. अर्थव्यवस्थेचे नियम निष्ठूर आहेत. ते कोणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे भविष्यात होणार्‍या परिणामांचा विचार करून पावले टाकावी लागतात.

सध्या आर्थिकदृष्ट्या देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, असे वाटत नाही. नोटबंदीच्या कालावधीत काळा पैसा बाहेर येईल, असे सांगितले जात होते. रिझर्व्ह बँकेने 99.3 टक्के पैसा परत आल्याचे सांगितले आहे. असे असले तरी आरबीआयने नोट बंदीबाबतचा फायनल हिशोब अद्याप दिलेला नाही. जर नोटबंदीचा फायदा झाला असेल तर तो विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून का घेतला जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विकास दर प्रचंड घसरला असून तो पाच टक्क्यांवर आल्याचे बोलले जात आहे. परंतु तोही आकडा खरा आहे असे वाटत नाही. त्यापेक्षाही खाली अडीच टक्क्यांपर्यंत विकासदर घसरला असल्याचे शक्यता आहे.

जीएसटीची प्रक्रिया अतिशय जटिल बनली आहे. प्रत्येक कर प्रणालीच्या मागे एक सिद्धांत असतो. जीएसटीमुळे कृषी क्षेत्राबरोबरच छोट्या-मोठ्या उद्योगांचे फार मोठे नुकसान झाले आहे. मागणी संपल्यामुळे किंबहुना मागणी होत नसल्यामुळे मंदीचे संकट निर्माण झाले आहे. हा लोकांच्याकडे पैसा नसल्याचा परिणाम आहे.

 ...म्हणून लोकांचा विश्वास राहिलेला नाही

या आर्थिक मंदीतून बाहेर पडायचे असल्यास जेथून सुरुवात झाली, त्या कृषी क्षेत्रापासून मंदी दूर करण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. सध्या लोकांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने चैनीच्या वस्तू बाजूला पडल्या आहेत. परंतु, सरकारी आकडेवारी काही वेगळेच दाखवले जात असल्याने त्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.