Tue, Sep 22, 2020 23:11होमपेज › Satara › खुनाचा प्रयत्न कलमाचा संबंधच नाही

खुनाचा प्रयत्न कलमाचा संबंधच नाही

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 10:48PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरुचि राडा प्रकरणात सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात खा. उदयनराजे भोसले गट व आ. शिवेेंद्रराजे भोसले गट या दोन्ही गटांच्या तीन वेगवेगळ्या जामीन व तात्पुरत्या जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद झाला. गोळीबार झाला असला तरी त्यामुळे कोणीही जखमी झाले नसल्याने खुनाचा प्रयत्न या कलमाचा संबंध येत नाही, असा युक्तिवाद खासदार गटाकडून करण्यात आला. दरम्यान, न्यायालयात दोन्ही गटाने पुन्हा धाव घेतल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुचि निवासस्थानाबाहेर झालेल्या राड्याप्रकरणी खा.उदयनराजे गटाच्या वतीने सोमवारी जिल्हा न्यायालयात चार  वकिलांनी युक्तिवाद केला. न्यायालयीन कोठडीत असणार्‍या बाळासाहेब  ढेकणे, विशाल ढाणे, विक्रम शेंडे, इम्तियाज बागवान, शेखर चव्हाण, केदार राजेशिर्के या सहा जणांसंबंधी युक्तिवाद केला. युक्तिवादामध्ये प्रामुख्याने हाफ मर्डरचे जे कलम लागले आहे ते चुकीचे असून फायरींगमुळे कोणीही जखमी झालेले नाही. दाखल झालेल्या तक्रारीमध्ये संशयित  सहा जणांच्या नावांचा उल्लेख नाही. अटक झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यासंबंधी काहीही जप्त केलेले नाही, असा विविध मुद्द्यांचा युक्तिवाद केला. अ‍ॅड.ताहिर मणेर, अ‍ॅड.संदेश कुंजीर, अ‍ॅड. एल. एम. भोसले  व अ‍ॅड.अंकुश जाधव यांनी याबाबतचा युक्तिवाद केला.

दरम्यान, आमदार गटाच्यावतीने अमोल मोहिते यांच्या तात्पुरत्या जामीन अर्जावरही बचाव पक्षाने युक्तिवाद केला. याशिवाय आमदार गटाच्या अन्य चार समर्थकांच्या जामीन अर्जावरही बचाव पक्षाने युक्तिवाद केला. दिवसभरात झालेल्या बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंगळवारी सरकार पक्ष त्यावर युक्तिवाद करणार आहे. यामुळे सरकार पक्षाच्या युक्तिवादाकडे लक्ष लागले आहे.