Mon, Jul 06, 2020 22:38होमपेज › Satara › मुख्यमंत्र्यांचा सातार्‍यात जलमंदिर व सुरूचीवर पाहुणचार

मुख्यमंत्र्यांचा सातार्‍यात जलमंदिर व सुरूचीवर पाहुणचार

Published On: Sep 16 2019 1:38AM | Last Updated: Sep 15 2019 11:46PM

जलमंदिर निवासस्थानी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा बुके देवून सत्कार केला. सोबत ना. चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, शेखर घोरपडे, रॉबर्ट मोझेस.सातारा : प्रतिनिधी
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस रविवारी रात्री सातार्‍यात आल्यानंतर त्यांनी श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी ‘मुख्यमंत्री, आपले उदयनराजे यांच्यावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच लक्ष राहू द्या. महाराष्ट्राचा भरभरुन विकास व्हावा,’ अशी अपेक्षा व्यक्‍त केल्यानंतर फडणवीस यांनीही  तेवढ्याच तत्परतेने होकार दर्शवला. दरम्यान, मुख्यमंत्री जलमंदिरवर पोहचताच त्यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. या पाहुणचाराने ते भारावून गेले.

रविवारी भाजपची महाजनादेश यात्रा सातार्‍यात आल्यानंतर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन यांनी उदयनराजे भोसले यांच्या जलंमदिर या निवासस्थानी रात्री 8 वाजता भेट दिली.

मुख्यमंत्री जलमंदिर निवासस्थानी आल्यानंतर राजमाता कल्पनाराजे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी काही मोजकीच मंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्री स्थानापन्‍न झाल्यानंतर राजमातांनी स्वत: त्यांना मिठाई व अल्पोपहार दिला. मिठाई पाहताच मुख्यमंत्री म्हणाले, ‘आईसाहेब गेल्या सहा महिन्यांपासून आपण मिठाई खाल्‍लेली नाही. आपण प्रेमाने दिलेली मिठाई पहिल्यांदा खातो,’ असे म्हणत त्यांनी ती मिठाई खाल्‍ली.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी विविध विषयांवर चर्चा सुरु झाली.  राजमाता म्हणाल्या, उदयनराजे भोसले यांच्यावर स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भरभरुन प्रेम केले आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या विकासाची गरज असून आज भाजपकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आईसाहेब, महाराजांवर सर्वांचे प्रेम आहे. आमची खूप चांगली मैत्री असून त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसालाही सातार्‍यात येवून गेलो आहे. महाराजसाहेब आता भाजपमध्ये आल्याने महाराष्ट्राचा गतीने विकास होईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

ना. फडणवीस यांचे अभयसिंहराजेंना अभिवादन 

सातारा : प्रतिनिधी
महाजनादेश यात्रा सातार्‍यात आल्यानंतर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्र्यांनी माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी भेट देत पाहुणचार स्वीकारला. यावेळी मान्यवरांचे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरु असून आज सोमवारी ती सातार्‍यात आली होती. सैनिक स्कूल येथील सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, ना. नरेंद्र पाटील यांनी जलमंदिर नंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची या निवासस्थानीही भेट दिली. तेथे सहकार महर्षि स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांचे  पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवेंद्रराजे यांचा पाहुणचार स्वीकारला.