Sun, Jul 05, 2020 15:46होमपेज › Satara › प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने फलटणमध्ये तणाव (video)

सातारा-फलटण पेटले: फलटणमध्ये तणाव (video)

Published On: Jun 15 2019 6:41PM | Last Updated: Jun 15 2019 10:46PM
फलटण : प्रतिनिधी 

नीरा देवधर च्या पाणी प्रश्‍नावर ना. रामराजे ना. निंबाळकर व खा. उदयनराजे भोसले यांच्यातील टिकेने वेगळे वळण घेतले आहे. सातारा येथे राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रामराजे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने फलटण येथे या घटनेचा निषेध करत फलटण बंदची हाक देण्यात आली. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दुपारनंतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली होती.

नीरा देवघरचे पाणी बारामती व इंदापूरला पाणी देण्यासाठी ना. रामराजे नाईक निंबाळकर हेच जबाबदार असल्याची टीका खा. उदयनराजेंनी केली होती. यावर रामराजे यांनी  उदयनराजेंवर पिसाळलेल्या कुत्र्याची टीका केल्याने राजघराण्याचा अपमान केला आहे, असा आरोप करत राजे प्रतिष्ठाणनच्या कार्यकर्त्यांनी सातार्‍यात रामराजे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. या घटनेच्या निषेधार्थ फलटण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण फलटण शहर बंद ठेवले. यामुळे फलटण मध्ये मोठा तणाव निर्माण झाला.

पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रामराजे यांच्या विजय असो च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच रामराजेंच प्रतीकात्मक पुतळा जाळल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. संतप्त राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या  विरोधात घोषणाबाजी करून दुपारी फलटण बंदचे आवाहन केले.

बंदला फलटणकर नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. अतिरिक्त पोलीस प्रमुख धीरज पाटील यांनी फलटण मध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी रामराजे यांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.