Thu, Jul 02, 2020 11:53होमपेज › Satara › अध्यात्म आणि निसर्गाचा अविष्कार येराडवाडीचे रूद्रेश्‍वर 

अध्यात्म आणि निसर्गाचा अविष्कार येराडवाडीचे रूद्रेश्‍वर 

Published On: Aug 27 2018 1:18AM | Last Updated: Aug 26 2018 8:47PMमारूल हवेली : धनंजय जगताप

सह्याद्रीच्या कुशीत, पांडवकालीन लेण्यात वसलेल्या व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येराडवाडी ( ता.पाटण ) येथील श्री स्वयंभू रूद्रेश्‍वर हे ठिकाण धार्मिक देवस्थाना बरोबर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत आहे. श्रावण महिन्यानिमित्ताने दर्शनासाठी येथे भाविकांसह पर्यटकांंची मोठी गर्दी होत आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेले व मल्हारपेठपासून अवघ्या 3 कि. मी. अंतरावर येराडवाडी गावालगत असलेले पांडवकालीन स्वयंभू रुद्रेश्‍वर मंदिर आहे. येथे शंभू महादेवाची पिंड असून हे ठिकाण रुद्रेश्‍वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थाना विषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, पांडवांनी पाटणच्या सरहद्दीवर मारूतीच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. नंतर दापोली येथे शंकराचे लिंग व वाघजाई देवीची स्थापना केली. पाटणपासून 2 कि. मी. अंतरावरील येरफळे येथे गुहेत शंकराचे स्थान आहे. तेथून अडुळ या ठिकाणी 2 कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत आहे.

गुहेत शंभू महादेवाची पिंड आहे. लेण्याच्या मध्यभागी शिवलिंग स्थापित केलेले आहे. या लेण्याची अंतर्गत रचना प्रसिध्द अजंठा लेण्यांसारखी आहे. शिवलिंगाच्या भोवती 24 खांब आहेत. मंदिराशेजारी भंडारागृह व त्यामध्ये 12 ते 14 लोकांना विश्रांती  घेता येईल, अशी आसने आहेत. मंदिराच्या पूर्वेस पाण्याचे कुंड आहे. मंदिरावरून फेसाळत कोसळणारा आकर्षक धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. मंदिरापासून डोंगराच्या पायथ्याशी एक कुंड आहे. 20 ते 25 वर्षांनी कडक उन्हाळ्यात त्या कुंडाला पाझर फुटतो अशी चर्चा आहे. ग्रामस्थांनी मंदिर परिसराचे सुशोभिकरण केले असून परिसराचा विकास केला जात आहे. मंदिराकडे जाण्यासाठी  श्रमदानातून जांभा दगडात पायर्‍याचे बांधकाम केले आहे. तसेच वनविभागाच्या सहकार्यातून परिसरात झाडे लावली असून विनामोबदला ग्रामस्थ त्याची देखभाल करत आहेत. येथे दाट वनराई असलेने त्यात वन्यप्राणी आसरा घेतात.

श्रावणातील तिसर्‍या सोमवारी रुद्रेश्‍वराचा भंडारा...

श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी रुद्रेश्‍वराचा भंडारा असतो. यादिवशी येथे यात्रेचे स्वरूप येते. तालुक्यासह दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. या उत्सवाला सुमारे 125 वर्षाची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. यानिमित्ताने ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा, महाभिषेक, रुद्राभिषेक, होमहवन, महाप्रसाद, भजन व किर्तन असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. निसर्ग रम्य परिसर लाभलेल्या रुद्रेश्‍वर देवस्थानचे धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

अजंठा वेरूळप्रमाणे येथील लेण्यांचा आकार...

या ठिकाणी बौद्धकालीन लेणी आहेत. एक लेणे अतिशय देखणे असून ते इसवी सन पूर्व  250 ते  दुसर्‍या शतकात गौतम बुध्दांचे अनुयायी हीनयान पंथीयांनी ही लेणी कोरलेली आहेत. हे लेणे अजंठा -वेरूळ या ठिकाणी आढळणार्‍या लेण्याप्रमाणे आहे . या लेण्यात  खांब आहेत. मधोमध एक स्तूप होता परंतु पूर्वी काही समाजकंटकांनी  उद्ध्वस्त केला असल्याचे दिसून येते . यासारखेच एक 5 क्रमांकाचे लेणे आगाशिव लेण्यात आहे. पण त्यात खांब कोरलेले नाहीत, असा उल्लेख गॅझेटियरमध्ये आढळतो, असे सामाजिक कार्यकर्ते शरद गाडे यांनी सांगितले.