Fri, Jul 10, 2020 02:11होमपेज › Satara › इन्स्टंट फूडच्या जमान्यात ग्रामीण बाज टिकून

इन्स्टंट फूडच्या जमान्यात ग्रामीण बाज टिकून

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:15PMभिलार : मुकुंद शिंदे

इन्स्टंट फूड, पिझ्झा बर्गरच्या झटपट जमान्यात पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे लोणची, पापड आणि सांडगे आता दुरापास्त झाले आहेत. बाजारात मिळणार्‍या पदार्थालाच गृहिणी अधिक पसंती देत असल्या तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही महिला व कुटुंबातील वयोवृद्ध स्त्रिया उन्हाळी पदार्थ तयार करून पारंपरिक ग्रामीण संस्कृती टिकवून ठेवताना दिसत आहेत. सध्या येथील महिलावर्गाची उन्हाळी पदार्थांसाठीची घाई-गडबड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 

सध्या ऐन उन्हाळ्याचे दिवस आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्याने चाकरमानी आपल्या गावाकडे आले आहेत. इतरवेळी शुकशुकाट असलेली गावे आता मुला-बाळांनी बहरली आहेत. नोकरदारवर्ग विश्रांती व मुलांच्या सुट्टीसाठी गावाला आला आहे. त्यामुळे गावाकडच्या वातावरणात आता वेगळाच उत्साह संचारला आहे. कुटुंबीय व नातवंडांना वर्षभर पुरतील असे पापड, लोणची आणि सांडगे तयार करण्यात ग्रामीण भागातील गृहिणी व आजी गुंतल्या आहेत. त्याचबरोबर वर्षभराचे धान्य, चटणी, तळण आदींसाठी ग्रामीण भागात धावपळ सुरू आहे. 

झटपटच्या जमान्यात पारंपरिक पद्धतीने बनविले जाणारे अनेक पदार्थ आता आधुनिक स्त्रिया घरी बनविण्याचे कष्ट घेत नाहीत. हे पदार्थ बाजारात सहजपणे उपलब्ध होत आहेत. पैसे द्या आणि खरेदी करा असा ट्रेेन्ड निर्माण झाला आहे. पिझ्झा, बर्गर, कुरकुरे तसेच भातवड्या, कुरवड्या बाजारात रेडिमेड मिळतात; पण अशा पदार्थांची चव कशी असेल हाही प्रश्‍न आहेच. ग्रामीण भागातील स्त्रिया  मात्र अजूनही पापड, लोणची, सांडगे यासारखे पदार्थ बनवताना दिसत आहेत. आजीबाईंची ही लगबग पाहण्यासारखी असते.

आदल्या दिवशी सर्व सामानाची जुळवाजुळव करून दुसर्‍या दिवशी पहाटे उठून उन्हाळी पदार्थ तयार करण्याचा घाट घातला जातो.गहू, तांदूळ, तूरडाळ यांचे पीठ बनवून, शिजवण्यापासून ते थापण्यापर्यंतचा वेळ आजी व कुटुंबातील महिलांसाठी महत्त्वाचा असतो. ज्या त्या वेळी योग्य ते झाले म्हणजे मग पदार्थ चांगले होतात. यासाठी आजींचा अट्टाहास असतो.  हे पदार्थ वाळवून गहू, तांदूळ, चणाडाळ, मटकी, शाबुदाना, पोहे यांचे तयार झालेले पापड,भातवड्या, कुरवड्या, सांडगे वाळवणे, ते भरून ठेवणे हे काम ग्रामीण भागातील महिला वर्ग आवडीने करत असतात.

त्यासाठी आजींची असलेली विशेष धडपड पहाण्यासारखी असते. हे पदार्थ मनापासून आणि आपल्या नातवंडे-परतवंडे यांच्यासाठी जीव ओतून केले जातात.  त्यात मायेचा गोडवा आणि प्रेमाचा मसाला असल्याने जी चव येते त्याला तोड नाही. कोणत्याही हॉटेलमध्ये पैसे देऊन खरेदी करता येणार नाही, असे हे चवदार पदार्थ वर्षभर मग कुटुंबीयांसाठी जिभेचे चोचले पुरवत असतात.