Wed, Jul 08, 2020 03:57होमपेज › Satara › सातार्‍यात पुन्हा आढळले भुयारी जलमार्ग

सातार्‍यात पुन्हा आढळले भुयारी जलमार्ग

Published On: Nov 08 2018 1:28AM | Last Updated: Nov 07 2018 11:15PMसातारा : विशाल गुजर

पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामात भुयारी जलमार्ग आढळल्याने सातारा शहराला असलेल्या ऐतिहासिक वारशाला उजाळा मिळाला होता. याच ग्रेड सेपरेटरच्या सुरु असलेल्या कामात आता सातारा नगरीचे संस्थापक  छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील भुयारी जलमार्गाची एक मालिकाच उघड झाली आहे. महाराजा सयाजीराव महाविद्यालय व इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर एक असे दोन नवीन भुयारी जलमार्ग आढळले आहेत. चारभिंतीच्या डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या शाहूनगरीत पूर्वेचे प्रवेशद्वार असलेला हा रस्ता आजही राजपथ म्हणूनच ओळखला जातो. आज ज्याठिकाणी गुरुवार बाग आहे त्याठिकाणी असलेल्या तख्ताच्या वाड्यात छत्रपती शाहू महाराजांचे वास्तव्य होते. त्यामुळे मोहिमेवर निघण्यासाठी अथवा शिलांगणाचे सोने लुटण्यासाठी वेशीवर येणार्‍यांसाठी किंवा छत्रपतींच्या भेटीसाठी येणार्‍या सरदारांचा हाच मुख्य रस्ता होता. या रस्त्याला लागूनच असलेल्या चारभिंतीच्या डोंगरावरुन येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी हा जमिनीखालील भुयारी जलमार्ग बांधला असावा, असा कयास बांधला जात आहे. 

यापूर्वी आयडीबीआय बँकेच्या समोर असाच भुयारी मार्ग सापडला होता. यानंतर हे दोन जलमार्ग सापडल्याने या भुयारांचा नाल्यासारखा वापर केला जात असल्याची खात्री पटते. पावसाळ्यात राजमार्गावरील तत्कालीन वाहतूक विनाअडथळा सुरळीत व्हावी यासाठीच ही व्यवस्था करण्यात आली होती. 

या सर्वच भुयारी मार्गांमध्ये बांधकामचे साम्य असून ही सर्व बांधकामे समकालीन आहेत.ही बांधकामे चुन्यामध्ये केलेली आहेत. विशेषत: चारभिंतीकडील बाजूच्या बांधकामाला दगडी कमान आहे. तशी कमान उत्तरेच्या बाजूला असलेल्या बांधकामात नाही. इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज परिसरातील जलमार्गाची पाहणी केली असता दगडी बांधकाम स्पष्ट दिसत आहे. याच मार्गावर सायली हॉटेलसमोरही असाच भुयारी जलमार्ग असण्याची दाट शक्यता आहे. या भुयारी जलमार्गांचे दुसरे टोक उत्तरेच्या दिशेने जाणार्‍या ओढ्यात उघडले जात होते. या भुयारी जलमार्गाच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण केल्यास चारभिंतीकडून येणारे पावसाचे पाणी इतरत्र पसरु नये, तसेच राजमार्गही सुस्थितीत राहावा यासाठीच हा जलमार्ग बंदिस्त केला असावा.  शहराच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी होत असलेल्या गे्रड सेपरेटरच्या कामामुळे हा शाहूकालीन ऐतिहासिक ठेवा पुन्हा पाहण्यासाठी मिळत आहे. तरी दुर्देवाने तो कायमचाच काळाच्या पडद्याआड जाणार आहे.