Sat, Sep 19, 2020 11:31होमपेज › Satara › परिचारिकांवर ताण

परिचारिकांवर ताण

Last Updated: Sep 17 2020 2:14AM
सातारा : विशाल गुजर

जिल्हा रुग्णालयातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे परिचारिका मेटाकुटीला आल्या आहेत. पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला अनेकदा विनंत्या करूनही जादा मनुष्यबळ मिळत नसल्याने सध्या कार्यरत परिचारिका दररोजच्या कामाच्या वाढत्या ताणामुळे अक्षरशः बेजार झाल्या आहेत. परिचारिकांची संख्या कमी असल्याने प्रत्येक शिफ्टला तीन परिचारिकांची आवश्यकता असलेल्या ठिकाणी एका परिचारिकेला संपूर्ण जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने तातडीने कृतिशील कार्यवाही करणे आवश्यक करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दोन दिवसात तब्बल दोन हजारावर बाधित आढळलेे आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या बुधवारी सत्तावीस हजारावर पोहचली. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये सुमारे 10  हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधील बहुतांश गंभीर रुग्णांचा भार हा जिल्हा रुग्णालयावर आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये 7 वॉर्ड व 20 बेडचे दोन अतिदक्षता विभाग कार्यरत आहेत. या वॉर्डमध्ये दररोज क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असतात. परंतु आहेत त्याच बेडसाठी आवश्यक असलेले परिचारिकांचे मनुष्यबळ पूर्ण क्षमतेने पुरवणे प्रशासनाला अद्याप शक्य झालेले नाही.

जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या कोरोनासाठी सात, तर नॉन कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी 13 विभाग कार्यरत आहेत. त्यासाठी एकूण परिचारिकांची मंजूर पद संख्या 186 आहे; परंतु त्यामधील विविध 21 पदे रिक्त आहेत, तर रजा व गैरहजर असलेले 17 जण आहेत. त्यामुळे केवळ 148 पदेच सध्या कामासाठी उपलब्ध आहेत. त्यातही रिक्त पदांचा चार्ज अधिपरिचारिकांकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामासाठी परिचारिका आणखी कमी पडत आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक वॉर्डसाठी दोन ते तीन परिचारिकांची आवश्यकता असते. त्याचबरोबर 20 बेडच्या आयसीयू वॉर्डसाठी तीन शिफ्टमध्ये मिळून कमीतकमी 30 परिचारिकांची आवश्यकता असते. संख्या कमी असल्याने प्रत्येक शिफ्टला तीन परिचारिकांची आवश्यकता असलेल्या ठिकाणी एका परिचारिकेला संपूर्ण जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येवू लागला आहे. कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या योद्ध्यांना सध्याच्या काळात जपणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे  मनुष्यबळाची उपलब्धता तातडीने करणे आवश्यक बनले आहे.
 

 "