होमपेज › Satara › जीएस निवडणुकीची अजूनही प्रतिक्षा

जीएस निवडणुकीची अजूनही प्रतिक्षा

Published On: Sep 21 2018 1:19AM | Last Updated: Sep 20 2018 7:58PMसातारा : मीना शिंदे

विद्यार्थी व विद्यापीठ प्रशासन यांच्यातील विद्यार्थी प्रतिनिधी (जीएस) दुवा ठरतात. महाविद्यालये सुरु होऊन तीन महिने झाले तरी विद्यापिठांमधील विद्यार्थी परिषद,  सिनेट आणि इतर प्राधिकरणाच्या निवडीबाबत महाविद्यालयांना काहीच सूचना मिळाल्या नसल्याने  जिल्ह्यातील सुमारे 40  महाविद्यालये आणि त्यातील  इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना  प्रवेश प्रक्रिया, परीक्षा तसेच महाविद्यालय अथवा विद्यापीठाशी निगडीत असणार्‍या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच संबंधित  प्रशासनापर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणजेच जी एस निवडला जातो. 

विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी प्रतिनिधी निवडीबाबत महाविद्यालयांना सूचना मिळाल्यानंतर  प्रक्रियेस सुरुवात केली जाते. 31 ऑगस्टपर्यंत   शेवटच्या टप्प्यातील लिस्ट फायनल होत असते.   मात्र, यावर्षी  महाविद्यालये सुरु होवून सुमारे तीन महिने झाले तरी अजून विद्यापिठाकडून जीएस निवड  प्रक्रियेबाबत काहीच सूचना महाविद्यालयांना मिळाल्या नाहीत. 

काही वर्षांपूर्वीपर्यंत  महाविद्यालयातील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका विद्यार्थ्यांच्या मतदान प्रक्रियेनुसार होत होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका  म्हणजे युवा नेतृत्व व कार्यकर्ते घडविणार्‍या कार्यशाळाच असतात. मात्र, या निवडणुकांमध्ये गैरप्रकार होवू लागल्याने पुढे विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका या गुणवत्तेवर आधारित घेण्यास सुरुवात झाली. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका रद्द करुन शैक्षणिक गुणवत्तेनुसार जीएस निवडी करण्यात आल्या.

जिल्ह्यातील सुमारे 40 महाविद्यालये व विद्यार्थ्यांमध्ये जीएस निवडी  या निवडणुकीतून होणार की गुणवत्तेनुसार होणार? गुणवत्तेवर होणार असेल तर कोणते निकष लावणार? असा संभ्रम कायम आहे.