Wed, Jul 08, 2020 09:05होमपेज › Satara › मला तोंड उघडायला लावू नका; आमदार देसाईंचा अजित पवारांना इशारा

मला तोंड उघडायला लावू नका; आमदार देसाईंचा अजित पवारांना इशारा

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 1:19AMसणबूर : तुषार देशमुख

दादा, पाटणमध्ये येऊन कुणाला तरी खूश करण्यासाठी माझ्यावर बेतालपणे बोलत असाल, तर मला तोंड उघडायला लावू नका, माझ्याकडेसुद्धा बोलण्यासारखे बरेच काही आहे हे विसरू नका, असा इशारा आ. शंभुराज देसाई यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.

आ. देसाई म्हणाले, अजितदादांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केलेली मदत दादा विसरले का? पाटणमध्ये येऊन तुम्ही माझ्यावर वैयक्‍तिक बोलावे, यासाठी मार्गदर्शन कोणाचे आहे, हे न कळण्याइतपत मी काही कच्चा राजकारणी नाही. मी अजूनही संयम बाळगून आहे. पाटणमध्ये येऊन कोणाचे तरी ऐकून त्यांना बरं वाटावं म्हणून माझ्यावर वैयक्‍तिक बोलत असाल, तर माझ्याही काही मर्यादा आहेत, त्या ओलांडायला लावू नका. मी आजपर्यंत बरंच काही मनात साठवून आहे, ते एकदा     बाहेर काढायला सुरूवात केल्यास तुम्हाला ते सहन होणार नाही. पदवीधर निवडणूकीत सारंग पाटील यांच्या विरोधात कोणी प्रचार केला? शिवाय त्यांच्याच गावात मारूलमध्ये कोणी टेबल लावले हे तालुक्यातील जनता विसरलेली नाही. जिल्ह्यात वाई, उंब्रज, दहीवडी,सातारा येथील हल्लाबोलची आंदोलने बघा आणि त्यांच्या तुलनेत पाटणचे हल्लाबोल आंदोलन बघा फरक तुमच्याच लक्षात येईल. कार्यकर्त्यांच्यावर दबाव आणून लोक जमवण्याचा पाटणकरांचा प्रयत्न असफल झाला आहे.

तालुक्यातील धरणग्रस्तांचे मार्गी लावलेले प्रश्न, गांव तिथे रस्ते,पाणीपुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना अशा कोट्यावधी रूपयांची विकासकामे तालुक्यात राबवल्याने विकासाच्याबाबतीत जिल्ह्यात पाटण तालुका अव्वल ठेवल्याने येथील जनता माझ्या कामावर समाधानी आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने हल्लाबोल मोर्चाकडे पाठ फिरवली. हे तुमच्या शिलेदारांचे अपयश तपासा आणि मग माझ्यावर टीका करा.

कधीकाळी अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो, तरी तालुक्याच्या हितासाठीच येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वत:चा मान सन्मान बघत नाही, त्यांच्यासाठी अहोरात्र झटत असतो. म्हणून माझ्या एका हाकेवर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने तालुक्यातील जनता माझ्या बरोबर उभी राहते. यावरून दादा तुमच्या लक्षात आले असेल तालुक्यातील जनता माझी आहे आणि मी जनतेचा आहे, असेही आ. देसाई म्हणाले.