Tue, Jul 14, 2020 03:38होमपेज › Satara › कार्यकर्त्यांचा ‘रात्रीस खेळ चाले’

कार्यकर्त्यांचा ‘रात्रीस खेळ चाले’

Published On: Apr 20 2019 1:55AM | Last Updated: Apr 19 2019 8:59PM
सातारा : प्रतिनिधी

लोकसभेच्या मतदानाचा दिवस तीन दिवसावर आला आहे. त्यामुळे प्रचाराची तंत्रेही गनिमी कावा पद्धतीने सुरू झाली आहेत. यामध्ये रात्री पारंपरिक निवडणुकांचा फंडा सुरू झाला आहे. यामुळे मते वळतील, या भीतीने उमेदवारांच्या यंत्रणांनी जागते रहोचे, आवाहन करत खास नाईट ड्युटी करणार्‍या कार्यकर्त्यांची पथके तयार केली आहेत.   ‘रात्रीस खेळ चाले’ असे म्हणत गावागावांत या नाईट ड्युटीवरील पथकांची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. 

सातारा व माढा लोकसभा निवडणुकीत यंदा प्रचंड चुरस आहे. विधानसभा निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. परस्परविरोधी उमेदवारांवर सोशल मीडियातून कमरेखालच्या टीका-टिप्पणीलाही सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक प्रभागात कोण उमेदवार निवडून येणार यावर पैजा लागल्या आहेत. पक्षाचे कार्यकर्ते तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणत स्थानिक आघाड्यांवर वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडत असल्याचे दिसते.

निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. 23 एप्रिल रोजी मतदान असल्याने आता काही संवेदनशील भागात रात्रीही विरोधकांच्या यंत्रणेवर लक्ष ठेवले जात आहे. आदर्श आचारसंहितेनुसार रात्री 10 नंतर प्रचार करण्यास निर्बंध आहेत. असे असले तरी गनिमी काव्याने भेटी गाठी सुरूच आहेत. एका रात्रीत एकगठ्ठा मते बदलणारी एक विशिष्ट यंत्रणा सध्या उमेदवारांसाठी काम करत असल्याचे दिसते. या यंत्रणेकडून पारंपारिक फंडा वापरून मतदारांना आपल्याकडे वळवले जात आहे. निवडणुकीतील ईर्षेमुळे अपवाद वगळता बहुतेक उमेदवारांकडून हा  ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू झाल्याचे दिसते.
एकगठ्ठा मतांच्या क्षेत्रात प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आमिष दाखवून मते फोडू नयेत यासाठी खास पथके तैनात झाली आहेत. पोलिसांच्या गस्तीपथकांच्या नजरेस पडू नये यासाठी ही पथके कार्यकर्त्यांच्या घरातच ठिय्या मांडून बसवण्यात आली आहेत. हालचाली टिपण्यासाठी अनेकांनी जाणीवपूर्वक काही कार्यकर्त्यांच्या टेरसला वॉच टॉवर सारखे बनवले आहे. हा रात्रीस खेळ चालेचा विषय मतदानाचा दिवस जवळ येईल तसा अधिकच आक्रमक होऊन एकमेकांच्या पथकांवर हल्ले-प्रतिहल्ले करेल असे दिसू लागले आहे.