Tue, Jun 15, 2021 11:06होमपेज › Satara › आचारसंहिता सांभाळून कार्यकर्त्यांचा प्रचार

आचारसंहिता सांभाळून कार्यकर्त्यांचा प्रचार

Published On: Apr 13 2019 1:51AM | Last Updated: Apr 12 2019 11:18PM
सातारा : योगेश चौगुले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रचाराच्या फैरी झडत आहेत.  जागृत मतदार आपले मत विकू नका, विकास करणार्‍याला मत द्या, असे आवाहन केले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पोस्ट झळकू लागल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका असो. या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा अगदी पुरेपूर उपयोग उमेदवारांसह कार्यकत्यांकडून केला जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारासाठी निवडणूक आयोगाचे बंधन आहे.

आचारसंहितेच्या काही चौकटीही आहेत. मात्र या सर्व चौकटी सांभाळून उमेदवार व कार्यकर्ते प्रचारासाठी सोशल मीडियाचा पूर्ण वापर करून मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. लोकसभा निवडणूकीत तर राजकाणाचे चित्र मांडणार्‍या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. कार्यकत्यांकडून सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचाराला सर्व सामान्यांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुक्‍त व्यासपीठ असलेल्या सोशल मीडियावरुन मतदारांकडून कमेंटच्या माध्यमातून कधी शाबासकीची थाप, तर कधी कानपिचक्याही काढल्या जात असल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीचे धुमशान सध्या जोरदार सुरु असून सोशल मीडिया यामध्ये कोठेही मागे राहिलेला नाही. सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्‍चित होताच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करुन माघारीनंतर तर चांगलीच रणधुमाळी सुरु झाली आहे. सोशल मीडियावरुन मजकूर आणि उमेदवाराची छबी तयार करून कार्यकर्त्यांकडून मतदारांना आकर्षित केले जात आहे. विविध प्रकारच्या टॅगलाईन व उमेदवारांचे फोटो शेअर करून कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू केला आहे. सभा, बैठकांबरोबरच सोशल मीडियाच्यामाध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. तसेच आपल्या उमेदवाराने केलेल्या विकासकामांचा सोशल मीडियावर धुरळा उडत आहे.

मतदारांची जागृतीही सोशल मीडियावरून... 

जागृत मतदार मतदानाविषयी जनजागृतीही सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. आपले मत विकू नका, 500 रुपयांना मत विकून 5 वर्षांचा विचार केल्यास आपण दररोज किती पैशांना विकले जात आहोत. त्याचे गणित सोशल मीडियावर मांडले जात आहे. यासह उमेदवारांच्या कामांचा लेखाजोखाही सोशल मिडियावर मांडला जात आहे. 5 वर्षात फिरकूनही न पाहणारी लोक आत्ता मतांचे दान मागायला येतील, गाफील राहू नका, त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन करणार्‍या पोस्टही सोशल मीडियावर झळकत आहेत.