Fri, Jul 10, 2020 03:24होमपेज › Satara › मराठा आरक्षणानंतर भरती प्रक्रियेस गती

मराठा आरक्षणानंतर भरती प्रक्रियेस गती

Published On: Dec 20 2018 1:26AM | Last Updated: Dec 19 2018 10:47PM
औंध : वार्ताहर

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये रखडलेल्या भरतीला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध शासकीय विभागांना सरकारने बिंदूनामावली (रोष्टर) तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने येत्या काही दिवसात मागासवर्गीय कक्षाला प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

शासनाच्या विविध खात्यांमध्ये पुढील दोन महिन्यांत 72 हजार जागांसाठी मेगाभरती होणार आहे. त्यामुळे तरूण बेरोजगारांना आशेचा किरण निर्माण झाला आहे. या भरती घोषणेमुळे तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामध्ये जिल्हा परिषद, आरोग्य, महसूल, शिक्षण व अन्य विभागातील पदे भरली जाणार आहेत. त्यातच शासनाने 16 टक्के मराठा आरक्षण दिल्याने या संवर्गातील युवकांनाही आता नोकरभरतीत आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी आरक्षण जाहीर न झाल्याने शासनाने ही भरती थांबवली होती. मात्र, आता भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याने अनेक शासकीय विभागांमध्ये जातनिहाय बिंदुनामावली आरक्षण दुरुस्ती करण्याचे काम सुरु झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर भरतीप्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे. विविध विभागांंना बिंदूनामावली तपासून घेण्यासाठी आदेश प्राप्त झाले आहेत. यासाठी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे रिक्त जागांचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. सरकारच्या आदेशामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

आता बिंदूनामावलीत होणार बदल

भरती करताना यापूर्वी बिंदूनामावली तपासली जात असे. त्यात अनु. जाती, अनु. जमाती, इतर मागासवर्गीय यांसह विविध प्रवर्गांसाठी त्या-त्या प्रमाणात जागा राखीव ठेवून भरती केली जात असे.  यापुढे  होणार्‍या भरतीत मराठा समाजासाठीही 16 टक्के जागा राखीव ठेवाव्या लागणार असून बिंदूनामावली तपासताना या 16 टक्कयांचाही विचार होणार आहे. म्हणजे, यापूर्वी राखीव जागा सोडून सर्वसाधारण संवर्गातील उमेदवारांसाठी 48 टक्के जागा होत्या. आता मराठा समाजाच्या 16 टक्के जागा यातून कमी होणार असल्याने सर्वसाधारण संवर्गासाठी 32 टक्के जागा शिल्लक राहणार आहेत.

भरती प्रक्रियेकडे तरुणाईचे लक्ष...

भरती प्रक्रिया सुरु झाल्याने तरुणाई पुन्हा विविध प्रकारच्या परीक्षांच्या तयारीला लागली आहे. संदर्भपुस्तिका मिळविणे, सोशलसाईटसच्या माध्यमातून माहिती संकलित करणे, गटचर्चा करणे तसेच व्हॉटसअ‍ॅप व अन्य साईटसवर आगामी भरती परीक्षा पध्दती तसेच अन्य बाबींवर जोरदार चॅटींग सुरू झाले आहे. त्यामुळे तरुणाई भरती प्रक्रियेच्या कार्यवाहीकडे डोळे लावून बसली आहे.