Sat, Jul 11, 2020 19:02होमपेज › Satara › अंगणवाडीतील बालकांच्या भविष्याला  ‘आकार’

अंगणवाडीतील बालकांच्या भविष्याला  ‘आकार’

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 10:14PMकराड : अशोक मोहने 

चिखलाच्या गोळ्यास त्यामधील गुणधर्म ओळखून आकार दिला जातो, याच संकल्पनेतून एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत अंगणवाडीतील बालकांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणणारा ‘आकार’ हा शालेय पूर्व अभ्यासक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हा प्रामुख्याने शून्य ते सहा वर्षे वयाच्या बालकांना पोषण आहार, आरोग्य आणि शाळापूर्व शिक्षण यांची संकलित सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.   दरम्यान बालकांच्या शारीरिक विकासाबरोबरच त्यांचा मानसिक,  बौद्धिक विकास करणे गरजेचे आहे, हे ओळखून एकात्मक बाल विकास सेवा योजना, युनिसेफ आणि एनसीईआरटी यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनातून अंगणवाड्यामध्ये आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. 

राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमाचे अंगणवाडी कर्मचार्‍यांना राज्य, जिल्हा, तालुका तसेच बीट पातळीवर विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी त्याच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर आधारित विविध सृजनशील कृतीमधून बालकांच्या शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी या अभ्यासक्रमात मुख्यत्वे भर देण्यात आला आहे.  बालकांच्या 3 ते 4 वर्षे, 4 ते 5 वर्षे आणि 5 ते 6 वर्षे वयोगटानुसार सोप्याकडून कठिणाकडे भाषापूर्व, गणितपूर्व, वाचनपूर्व अनुभवामधून बालकांची प्राथमिक शिक्षणक्रमासाठी पायाभूत तयारी करून घेतली जात आहे. 

‘आकार’ हा क्षमता विकासावर आधारीत अभ्यासक्रम सार्वत्रिक करण्याचा केंद्र शासनाचा कल असून देशात प्रथम महाराष्ट्रातील अंगणवाड्यामधून त्याची अंमलबजावणी होत आहे.

आकार अभ्यासक्रमांतर्गत चेतना व्यायाम, शारीरिक विकासाचे खेळ, स्पर्शपट्टी, गंधकुपी, श्रवणडब्या, दृकअनुभूती, प्रत्यक्ष चव याद्वारे पंच ज्ञानेद्रीयांचा अनुभवविकास, डोमीनोज, चित्रकोडी, शब्दकोडी, पाहुणा ओळखा, साम्यभेद कृती, क्रमवारी तुलना करणे, कुतूहल कोपरा यातून कल्पनाशक्ती व तार्किक विकास, खेळघर, मुक्तखेळ, गोलातील गप्पा, अभिनयगीते यातून भावनिक विकास, चिकटकाम, रंगकाम, ठसेकाम, मातीकाम, रंगसंगती, क्रीडास्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामधून बालकांच्या व्यक्तीमत्वाची  पायाभरणी अंगणवाड्यामधून सुरू झाली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकवर्गातून स्वागत होत आहे.