Fri, Jul 03, 2020 17:05होमपेज › Satara › शिवसेना सातारा लोकसभा लढणार : हरिदास जगदाळे

शिवसेना सातारा लोकसभा लढणार : हरिदास जगदाळे

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 10:40PMसातारा : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक झाली होती. त्यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सातारा, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी  केली. यावर  उध्दव ठाकरे सकारात्मक  असले तरी त्याबाबत ऐनवेळी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती   सेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हरिदास जगदाळे म्हणाले, पुण्यात झालेल्या मेळाव्यात गजानन किर्तीकर, संजय राऊत, दगडूदादा सपकाळ, मिलिंद नार्वेकर,  नितीन बानुगडे-पाटील यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथप्रमुख यांच्या याद्यांचा अहवाल घेतला. शिवसेनेने जिल्ह्यात सदस्य नोंदणी सुरु केली आहे. नोंदणी अभियानात 50 हजार सदस्यांची नोंदणी  झाली.  पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीत कामकाजाचा आढावा घेतला. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात अनेकजण इच्छूक आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला तीन नंबरची मते मिळाली असली तरी आमच्यासाठी येथील भाजपचा उमेदवार गौण  आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची टक्‍कर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर होईल. मात्र, या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाईल हे अद्याप ठरलेले नाही. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हेच यावर निर्णय घेतील, असेही हरिदास जगदाळे यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार तगडा वाटत नाही का? असे विचारले असता हरिदास जगदाळे म्हणाले, विद्यमान खासदारांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे लोकांच्या नाराजीचा फायदा शिवसेनेला होईल. खासदारांकडून विकासकामे झाले नसल्याचेही  जगदाळे यांनी सांगितले. सातार्‍यात 700 कोटींची कामे सुरु असल्याचे सांगितले जात असताना  विकासकामे होत नाहीत हे कसे? असे विचारले असता, जगदाळे म्हणाले, एवढी विकासकामे सुरु असती तर लोकांना ती दिसली असती असे त्यांनी यावेळी सांगितले. 

मुख्याध्यापक अमोल कोळेकर खंडणीप्रकरणाबाबत विचारले असता जगदाळे म्हणाले,  संबंधित मुख्याध्यापकाला मारहाण झालेली नसून त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही उपलब्ध आहे. संबंधित मुख्याध्यापक सर्किट हाऊसला आल्यावर लगेच गेला, हे सीसीटीव्हीत दिसत असताना डांबले असा चुकीचा आरोप केला जात आहे. राजकीय षड्यंत्र रचून मला व सुनील काळेकर यांना या प्रकरणात नाहक गोवण्यात आले. या प्रकरणाची पक्षश्रेष्ठींना माहिती आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांत मतभेद नाहीत. पालकमंत्र्यांच्या कामकाजावर लोकांसह पक्षातील पदाधिकारीही समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी  हणमंतराव भिलारे, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय नलावडे, आकाश जाधव, गिरीष सावंत, रमेश बोराटे, सचिन जवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.