Fri, Jul 10, 2020 02:30होमपेज › Satara › पवारांसमोर शेखर गोरे समर्थकांचा राडा

पवारांसमोर शेखर गोरे समर्थकांचा राडा

Published On: Feb 23 2019 1:39AM | Last Updated: Feb 22 2019 11:11PM
फलटण : प्रतिनिधी 

माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात आपल्याला किंवा आपल्या कार्यकर्त्यांना बोलू न दिल्याने माण-खटावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच जोरदार राडा केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांच्या भाषणावेळी जोरदार गदारोळ करत कार्यकर्त्यांनी त्यांना भाषण आटोपते घ्यायला भाग पाडले. शेखर गोरे यांच्याऐवजी माणमध्ये पर्यायी नेतृत्व उभे करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाला विरोध करत शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी दस्तुरखुद्द  शरद पवार यांचेही न जुमानता त्यांचेही भाषण थांबवले. पवारांच्या माढ्याच्या लढाईत पहिल्याच घासाला खडा लागला असून, फलटणच्या सभेतच राष्ट्रवादीमधील ‘आप बिती’ राज्यभर पसरल्याने एकच खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर फलटणमध्ये प्रथमच त्यांनी सजाई गार्डनमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला माढा मतदार संघातील सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर,  माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जि.प.चे अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दादाराजे खर्डेकर, रघुनाथराजे ना. निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सुनील माने यांच्यासह माण-खटाव, फलटण मतदार संघातील दिग्गज नेतेमंडळी व्यासपीठावर होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माण-खटावचे नेते शेखर गोरे यांनाही या मेळाव्याचे निमंत्रण होते. शेखर गोरे हे त्यांच्या भगिनी सौ. सुरेखा पखाले व आपल्या समर्थकांसह मेळाव्याच्या स्थळी पोहोचले. त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह केला गेला. मात्र, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी आग्रह करुनही शेखर गोरे व सुरेखा पखाले हे व्यासपीठावर गेले नाहीत. ते खाली कार्यकर्त्यांमध्येच बसले.

कार्यकर्ता संवाद मेळावा सुरु झाल्यानंतर माण-खटावच्यावतीने प्रा. कविता म्हेत्रे यांनी भाषण करण्यास सुरुवात केली. माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कसा विजय मिळत गेला हे त्या सांगत असतानाच शेखर गोरे यांचे कार्यकर्ते ‘विधान परिषदेत शेखर भाऊंचा पराभव कसा झाला तेही सांगा’, असे ओरडू लागले. ‘पराभव कुणी कुणी केला त्यांची नावे सांगा’, असेही ते म्हणू लागले. गटागटाने कार्यकर्ते समोर येवू लागले. ‘सर्व सांगा... खरं खरं सांगा...’, असा कार्यकर्त्यांमधून जोरात आवाज सुरु झाला. ‘आम्हाला दाबलं जातं, किती सहन करायचं, कायम आमच्यावर अन्याय, आमच्या नेत्यावर अन्याय असे म्हणत कार्यकर्ते पुढे येवू लागले. त्यामुळे एकच राडा सुरु झाला. शेखर गोरे हेही कमालीचे संतप्त होते. कार्यकर्ते ऐकत नसल्याने कविता म्हेत्रे यांनी भाषण आटोपते घेतले. त्यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर घार्गे, रामराजे ना. निंबाळकर यांनी ओळीने भाषणे केली. त्यानंतर लगेचच शरद पवार भाषण करायला उठले. शरद पवार बोलायला सुरुवात करणार तोच ‘साहेब, तुम्ही बोलल्यानंतर आमचं कोण ऐकणार?’ असे म्हणत शेखर गोरे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आधी आम्हाला बोलू द्या, असा त्यांनी आग्रह धरला. थेट शरद पवार यांचे भाषणच थांबवले गेल्याने व्यासपीठावर एकच खळबळ माजली. संजीवराजे ना. निंबाळकर, शिवरुपराजे  खर्डेकर हे खाली उतरुन गेले. त्यांची व शेखर गोरे यांच्यामध्येही बाचाबाची झाली. ‘आम्ही इथे आमच्या भावना मांडायला आलो आहे आणि आमच्यावर दादागिरी सुरु असेल तर चालणार नाही’, असे शेखर गोरे म्हणाले. त्यावर पवार साहेब बोलत असताना कार्यकर्त्यांनी उठून बोलणे योग्य नाही, असे संजीवराजे ना. निंबाळकर म्हणाले. मात्र, कार्यकर्ते ऐकत नव्हते.  शेखर गोरेही कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संजीवराजे ना. निंबाळकर व शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची व बुकला बुकली होवू लागली. अरे तुरेची भाषा वाढली. प्रसंग हमरीतुमरीवर जावू लागला. शरद पवारांनी माईकवरुनच कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी शिष्टाई करत शेखर गोरे यांना व्यासपीठाकडे आणले. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते पवारसाहेबांजवळ सांगा, असे ते म्हणाले. त्यानंतर शेखर गोरे व्यासपीठावर गेले. कार्यकर्तेही त्यांच्या पाठीमागे जावू लागताच पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी पोलिसांची व कार्यकर्त्यांची जोरदार बुकला बुकली झाली. कार्यकर्ते त्वेषाने बोलत होते. याच गोंधळात शेखर गोरे व्यासपीठावर गेले. ते शरद पवारांच्या पायाही पडले. पवारांनी त्यांचा हात धरला, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेखर गोरे यांनी त्यांच्या हातात एक पत्र दिले. मला फक्त माझ्या भावना मांडायच्या होत्या. दीडवर्षे मी तुमची भेट मागतोय. मात्र, मला तुम्हाला भेटू दिले जात नाही. आज इथे आम्हाला बोलू दिले जात नाही. इथे अरे तुरे बोलले जात आहे. त्यामुळे मी जे काही लिहून आणले आहे ते आपण शांतपणे वाचावे आणि त्यानंतरच आपण निर्णय घ्यावा, असे त्यांनी पवारांना सांगितले. त्यानंतर शेखर गोरे कार्यकर्त्यांना घेवून बाहेर पडले. बाहेर पडतानाही कार्यकर्त्यांनी शेखर गोरेंच्या नावाने घोषणाबाजी केली. 

फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या माढा मतदार संघाच्या पहिल्याच कार्यकर्ता संवाद मेळाव्यात झालेला विसंवाद राज्याच्या कानाकोपर्‍यात जावून पोहोचल्याने एक हलकल्लोळ उडाला आहे. शरद पवार यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. फलटणमध्ये अचानकच उद्भवलेल्या या प्रसंगाने राष्ट्रवादीमध्ये आप-बितीचे वातावरण तयार झाले. माढा लोकसभा मतदार संघ पुन्हा लढायला निघालेल्या शरद पवारांच्या लढाईच्या पहिल्याच घासाला खडा लागला. त्याची जोरदार राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली.

हा तर शेखर गोरेंचा बेशिस्तपणा : आ. शिंदे

फलटणमध्ये झालेल्या प्रकाराबाबत वृत्तवाहिन्यांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आ. शशिकांत शिंदे यांनी शेखर गोरे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, मी प्रत्यक्षात कार्यक्रमाला गेलो नव्हतो. कार्यक्रमस्थळी शेखर गोरे यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे मला समजले आहे. वास्तविक मी व रामराजे यांनी शेखर गोरे यांच्याशी चर्चा केली होती. विधानपरिषदेच्या पराभवाची सल त्यांच्या मनात होती. अलिकडच्या काळात मतदारसंघात त्यांना पक्षातून डावलण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर त्यांना खा. शरद पवार यांच्याशी चर्चा करू, असे मी सांगितले होते. मात्र, खा. शरद पवार यांच्या सभेमध्ये त्यांनी  नीट वागायला हवे होते. त्यांनी जे काही केले आहे त्याबाबत त्यांना विचारणा होवून त्यांची  चौकशी केली जाईल.  मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकून घ्यायला हवे होते. जे केलं ते चुकीच केलं हे माझे स्पष्ट मत आहे. अशा प्रकारे भूमिका मांडणे हा बेशिस्तपणा आहे, असेही आ. शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. 

बोलू न दिल्याने कार्यकर्ते संतप्त : शेखर गोरे

सभास्थळाहून बाहेर पडताना शेखर गोरे यांनी पत्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांच्याविरोधात लढून मी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, सोसायट्या, दूध संघ, मार्केट कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणली. तरीही विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाकडे जास्त मते असतानाही पक्षातील मंडळींना माझा पराभव केला. त्याचे उत्तरही अद्यापही पक्षाने मला दिले नाही. माण-खटावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व माझ्याकडे दिले असताना मला कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही. मला व माझ्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. काल आलेल्यांना व पक्षासाठी योगदान नसणार्‍यांना संधी दिली जाते हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कविता म्हेत्रे यांच्याशी माझा कोणताही वाद नाही. आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्याशी आहे.  शेखर गोरे पुढे म्हणाले, पक्षासाठीच मी आंदोलने केली. पक्षासाठी आंदोलने करताना माझ्यावर मोक्कासारखी कारवाई झाली. त्यातून मी बाहेर पडलो पण मधल्या काळात पक्षाने मला अजिबातच विचारले नाही. मी, गेली दीड वर्षे शरद पवार यांची भेट मागत आहे. मात्र, पक्षाची सातारा जिल्ह्याची मंडळी मला त्यांना भेटू देत नाहीत. फलटणमध्येही पवार साहेब बोलण्यापूर्वी मला किंवा माझ्या एका कार्यकर्त्याला बोलायची संधी द्यायला हवी होती. आम्हाला आमच्या भावना मांडायच्या होत्या. मात्र, आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे आमचे कार्यकर्ते चिडले. आम्ही कोणताही राडा वगैरे केला नाही. अन्यायाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. मीही शरद पवार यांच्याकडे एक पत्र देवून माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी शरद पवार यांना माझे दैवत मानले आहे. त्यांनी योग्य तो विचार करावा. मीही दहिवडीत जावून कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेईन, असेही शेखर गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.