Sat, Jul 04, 2020 02:21होमपेज › Satara › राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार शशिकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार शशिकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 10:25PMसातारा : प्रतिनिधी 

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 29 रोजी पुणे येथे होत असून या बैठकीत पक्षाध्यक्ष खा. शरद पवार प्रदेशाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. दरम्यान,कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा असून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यानुसार नव्या दमाची टीम फिल्डवर उतरवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा कार्यकाल आता जवळपास पूर्ण होत आल्याने आता नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. या पदासाठी आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाची सातारा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.  याशिवाय आ. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. हे तिन्ही नेते वजनदार असल्याने खा. शरद पवार ही निवड करताना त्यांचे राजकीय कसब पणाला  लावणार आहेत.

आ. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आमदार व कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. सन 1999 पासून सुरूवातीला दहा वर्ष जावलीचे तर मागील 9 वर्ष कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. यापुर्वी आ.शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्षपद भूषविले. मागील आघाडी सरकारच्या कालावधीत ते  सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर माथाडी कामगारांचे मोठे संघटन त्यांनी आजपर्यंत केले असून रविवार दि. 29 रोजी पुण्यात होणार्‍या बैठकीत प्रदेशाध्यक्ष निवडीवर त्यांची वर्णी लागणार का? याची उत्सुकता आहे.