Sat, Oct 24, 2020 08:07होमपेज › Satara › जरा याद करो ‘वो’ बरसात की रात

जरा याद करो ‘वो’ बरसात की रात

Last Updated: Oct 18 2020 12:00PM
हरीष पाटणे

आठवतंय ना! आज बरोब्बर एक वर्ष झाले. गेल्यावर्षी दि. 18 ऑक्टोबर 2019 या दिवशी सातारची लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची ‘ती रात्र’ पावसाने एवढी पेटवली की त्या रात्रीच्या गर्भातच आजची ‘महाविकास आघाडी’ साकारली. कोसळत्या पावसात 80 वर्षांचे शरद पवार एवढे बरसले की चमत्कार घडावे असे राज्यात सत्तांतर झाले. दस्तुरखुद्द पवारांना, राष्ट्रवादी काँग्रेसला, राष्ट्रीय काँग्रेसला,  शिवसेनेला पुन्हा उभारी देणार्‍या सातार्‍याला कधीही विसरता येणार नाही. पावसाच्या या सभेने राजकारणाची कुस बदलली, सत्तेत नसणार्‍यांची कुस उजवली पण ज्या मातीने हा चमत्कार घडवला तिला मात्र वांझोटेपणाच्या कळा सोसायला लागू नयेत एवढीच पाऊस अंगा-खांद्यावर लोळवलेल्या भूमीची अपेक्षा आहे! 

आठवा महाराष्ट्राचे राजकारण. फडणवीसांचा झंझावात सुरू होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या छावण्या रिकाम्या करत फडणवीस मजल दरमजल करत महाराष्ट्र पादाक्रांत करत होते. त्यांच्या कबिल्यात राजे-महाराजे, सरदार, संस्थानिक, बलाढ्य राजकारणी सामील होत होते. महाराष्ट्राचा रणसंग्राम पेटला होता आणि फडणवीस ‘कुस्ती कुणाशी करायची? समोर पैलवानच नाही’ असे म्हणत आव्हाने प्रतिआव्हाने देत होते. ‘पवारसाहेबांची अवस्था म्हणजे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बचे हुए मेरे साथ आओ अशी झाली आहे’ अशी विधाने करत फडणवीस राष्ट्रवादीची हवा काढत होते. राज्यात भाजपची एकतर्फी सत्ता येईल एवढे वातावरण त्यांनी ढवळून टाकले होते. दुसरीकडे एकटे शरद पवार झुंझताना दिसत होते. महाराष्ट्रभर तेही फिरत होते. मात्र, जिथून अख्ख्या महाराष्ट्राला हाक द्यावी अशी युध्दभूमी त्यांना सापडत नव्हती. 

अशातच दि. 18 ऑक्टोबर 2019 ची ती रात्र उजाडली. राष्ट्रवादीतून भाजपच्या गोटात गेलेले छत्रपती उदयनराजे व शरद पवारांचे शाळकरी मित्र श्रीनिवास पाटील यांच्यातील घनघोर संघर्षाचा निकाल लावणारी प्रचार सभा याच रात्री होणार होती. विधानसभेला उभे राहिलेल्या राष्ट्रवादीच्या मातब्बर शिलेदारांचाही निकाल लावणारी हीच प्रचार सभा. 80  वर्षांचे शरद पवार रक्‍ताळलेल्या पायाला पट्ट्या बांधून त्यांच्या लाडक्या सातारा या बालेकिल्ल्यात दिवसभर हिंडत होते. त्यांचे ते विराट दर्शन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व तरुणांना आतून पेटवत होते. मुळातच पवार जनमाणसाची नाडी ओळखण्यात कमालीचे हुशार. राज्यात चमत्काराचा कोणताही मागमूस नव्हता. एकेक शिलेदार शत्रूच्या छावणीत दाखल झाला होता. अशा कठीण परिस्थितीत सातारा हीच पवारांना सहानुभूतीची लाट उभी करणारी युद्धभूमी वाटली. पाटणहून पवार लेट निघाले. इकडे जिल्हा परिषदेच्या मैदानावर चलबिचल सुरु होती. आभाळ भरुन आले होते. ढग दाटले होते. आता सभा होते की नाही अशी परिस्थिती निर्माण होत होती. व्यासपीठावरुन आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील ही मंडळी साहेब वेळेत येतात का याचा अंदाज घेत होती.  शरद पवार यांना यायला वेळ होतोय हे लक्षात आल्यानंतर नेत्यांच्या काळजात कालवा कालव होवू लागली. पावसाने टिप्पीर धुमाकूळ सुरु केला. तसा मैदानात बसलेल्यांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली. डायसवरुन संतोष कणसे आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवार येत आहेत असे सांगत होते. शेवटी कणसेंच्या हातात एक चिठ्ठी गेली. त्यातला मजकूर वाचताना कणसेंनाही त्वेष चढला. ‘80 वर्षांचा म्हातारा, तुमचा नेता रक्‍ताळलेल्या पायाने पडत्या पावसात सभेसाठी यायला निघालाय आणि तुम्ही पावसाला घाबरुन घरी निघालाय, शरद पवारांना मानत असाल तर जागच्या जागी खाली बसा!’ संतोष कणसे यांनी दोन-चार वेळा ती चिठ्ठी त्वेषपूर्ण आवाजात वाचली आणि चमत्कार झाला. कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या आणि जागेवरच तळ ठोकला. तशा परिस्थितीतच पवार व्यासपीठावर आले. वादळी पावसाची चकांदळ, कार्यकर्त्यांचा जल्‍लोष यामुळे वातावरण एवढे पेटले की पवारांनी त्यांच्या डोक्यावर कुणी तरी उभी केलेली छत्री हाताने बाजूला सारली. कोसळत्या पावसात पवार जनतेपुढे भिजत उभे राहिले. देश-विदेशातील माध्यमांचे कॅमेरे ही सभा लाईव्ह दाखवत होते. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हे सारे अलौकिक दृश्य उघड्या डोळ्यांनी पहात होते. पवारांना जे नेपथ्य उभे करायचे होते ते पावसाने त्यांना साधून दिले होते. ज्या जनतेने उभी हयात त्यांना देव मानले ती जनता त्यांच्यासमोर होती. 80 वर्षाच्या म्हातार्‍या माणसाला पावसात भिजयाची वेळ आली आहे अशी सहानूभुतीची मोठी लाट महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात सातार्‍यातून पोहचत होती. काठावरच्या उमेदवारांना हीच लाट विजयापार घेवून जात होती. पवारांनी कोसळत्या पावसाच्या सभेलाच युद्धभूमीचे रुप दिले आणि पवार बरसू लागले. एकेक ठेवणीतला शब्द पावसालाही चिरत गेला, कार्यकर्ते खुर्च्या आभाळात भिरकावू लागले. पवारांनी कोसळत्या पावसात सभा पेटवली होती. त्यात रथी-महारथी ‘धुवून’ निघालेच पण महाराष्ट्राच्या राजकारणाचीही कुस बदलली. सभेपूर्वी स्वप्नातही कुणाला वाटत नव्हते राज्यात सत्तांतर  होईल, जे सत्तेत येणार नव्हते त्यांची राजकीय कुस पावसाच्या सभेने उजवली आणि या पावसाच्या सभेच्या रात्रीच्या गर्भातच महाविकास आघाडीचे बीज पेरले गेले, त्याचाच वृक्ष म्हणून आजचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्याच त्या ऐतिहासिक सभेला आज दि. 18 ऑक्टोबर 2020 यादिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे. 

ही सभाच झाली नसती तर चमत्कार दिसला नसता, आजची महाविकास आघाडीही दिसली नसती आणि हे सरकारही दिसले नसते. पवारांनी ज्या भूमीला त्या रात्री युद्धभूमीचे स्वरुप दिले  त्या सातारा या भूमीचे त्यामुळेच आजच्या सरकारमध्ये योगदान आहे. शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या सरकारचे घटक असणार्‍या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांना व त्यांच्या नेत्यांना सातार्‍याच्या भूमीला विसरता येणार नाही. ज्या सभेने तुमच्या राजकारणाची कुस बदलली त्या भूमीला विकासाचे वांझोटेपण येता कामा नये ही जबाबदारी त्यामुळेच राज्यकर्ते म्हणून महाविकास आघाडी सरकारची आहे. जेव्हा जेव्हा सातार्‍यावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला दि. 18 ऑक्टोबर 2019 च्या  रात्रीची आठवण करुन दिली जाईल. ज्यांनी-ज्यांनी या सभेच्या यशस्वीतेसाठी कष्ट वेचले त्यांच्या-त्यांच्याविषयी या सरकारमध्ये असणार्‍यांना जाणीव ठेवावी लागेल. दि. 18 ऑक्टोबर 2019 तुम्ही कधीच विसरु शकणार नाही आणि तुम्ही विसरला तर आम्ही तुम्हाला कधी विसरु देणार नाही. सातार्‍याच्या विकासाचे वांझोटेपण घालवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावले उचलावीत हेच आजच्या वर्षपुर्तीचे सांगणे आहे. वर्षापूर्वी ज्या सातार्‍यात पडलेला पाऊस सरकार बांधून गेला आता त्याच सरकारने त्याच सातार्‍यासाठी फक्‍त घोषणांचा पाऊस पाडू नये, जरा याद करो वो बरसात की रात!

 "