Mon, Aug 03, 2020 15:35होमपेज › Satara › तालिका अध्यक्षपदी आ. शंभूराज देसाई 

तालिका अध्यक्षपदी आ. शंभूराज देसाई 

Published On: Mar 04 2019 1:06AM | Last Updated: Mar 03 2019 8:53PM
सणबूर : वार्ताहर

महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटू आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद व विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आ. शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी या पंचवार्षिकमध्ये तिसर्‍यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनामध्ये आ. शंभूराज देसाई यांची तालिकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ना. हरीभाऊ बागडे यांनी विधानसभा सभागृहात केली होती.

महाराष्ट्र विधानसभा हे लोकशाहीचे महामंदीर असून राज्यातील सर्वोच्च असे सभागृह आहे. या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम 8 अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. 

शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आ. शंभूराज देसाई यांचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाने सन 2014 ते 2019 या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी तिसर्‍यांदा नियुक्ती केली आहे. 

सन 2016 चे पावसाळी अधिवेशन, 2018 ला अर्थसंकल्पीय अधिवेशन व नुकतेच संपलेले अधिवेशन अशा तीन अधिवेशनात आ. शंभूराज देसाई यांना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला आहे. आ. शंभूराज देसाई यांना तिसर्‍यांदा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.