Sat, Jul 11, 2020 18:55होमपेज › Satara › शाहू चौक उठलाय प्रवाशांच्या जीवावर

शाहू चौक उठलाय प्रवाशांच्या जीवावर

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 7:50PM

बुकमार्क करा
सातारा : महेंद्र खंदारे

सातार्‍यातील पोवईनाका ते राजवाडा या मार्गावरील नगरपालिकेलगतचा शाहू चौक दिवसेंदिवस डेंजरझोन होऊ लागला आहे. वारंवार घडणार्‍या अपघातांमुळे हा चौक अनेकांच्या जीवावर उठला आहे. अपघात टाळण्याच्यादृष्टीने येथे कोणत्याही उपाययोजना लागू करण्यात आल्या नसल्याने प्रवाशांसह वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

काही दिवसांपूर्वी शाहू चौकात अ‍ॅपे रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले होते. यामुळे येथील वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. या चौकात चार रस्ते एकत्र येतात. मात्र एकाही मार्गावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचा वेग कमी होत नाही. तसेच बंद पडलेली सिग्‍नल यंत्रणा आणि झेब्रा क्रॉसिंग नसल्याने शाहू चौक डेंजर झोन बनला आहे. पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या या चौकात सतत धोका असताना आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. 

राजपथ आणि पोवई नाक्याकडे जाणार्‍या रस्त्याला जोडणारा दुवा म्हणून शाहू चौकाला संबोधले जाते. या चौकात समर्थ मंदिर, राजवाडा, पोवई नाका आणि चार भिंती येथून येणारे चार रस्ते एकमेकांना मिळतात. चार भिंती येथून येणारा रस्ता वगळता इतर तिन्ही मार्गावर वाहतूक जास्त असते. त्यातच नगरपालिका जवळ असल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची सतत वर्दळ असते. वाहनांचे प्रमाण जास्त असल्याने अनेक वेळा किरकोळ अपघातही झाले आहेत.

तेव्हापासूनच या चौकात स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे कायम  दुर्लक्ष झाले आहे. या चौकातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्‍नल लावण्यात आले आहेत मात्र ते बंद आहेत. तसेच येथे वाहतूक पोलिस नसल्याने कशाही प्रकारे वाहने दामटली जातात. त्यातच समर्थ मंदिर बाजूने येणार्‍या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. तर राजपथावरून अण्णाभाऊ साठे स्मारका जवळून समर्थ मंदिरकडे जाणार्‍या वाहनधारकांना पुढील वाहने दिसत नाही. तर अभयसिंहराजे उद्याच्या लेनवरून गेल्यास दोन रस्ते क्रॉस करावे लागतात. 

यासाठी चारही रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी बॅरिकेटस् लावून योग्य त्या मार्गाने वाहतूक वळवली पाहिजे. तसेच समर्थ मंदिर व चार भिंती कडून येणार्‍या रस्त्यावर स्पीड ब्रेकर करणे आवश्यक झाले आहे. चौकातील वाहनांची वर्दळ पाहता सिग्‍नल यंत्रणा सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका याकडे लक्षच देत नसल्यामुळे हा प्रश्‍न अधांतरीच आहे. या चौकातून वाहने चुकवत रस्ता पार करण्यासाठी नागरिकांनाही मोठी कसरत करावी लागते. चारही बाजूने एकदम वाहने येत असल्यामुळे रस्ता पार करण्यात अडथळे येतात. त्यामुळे काही वेळा वाहनधारक आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग झालेले आहेत. 

अधिकार्‍यांना त्रास होऊनही कानाडोळा..

शाहू चौकात सातारा पालिकेच्या अनेक अधिकार्‍यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडूनही कोणताही पाठपुरावा न झाल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता कायम आहे. स्पीड ब्रेकर केल्यानंतर काही फार फरक पडेल.  एकीकडे रविवार पेठेत 100 मीटरवर धोका नसताना स्पीड ब्रेकर आहेत. तर धोकादायक असणार्‍या रस्त्यावर मात्र एकही स्पीड ब्रेकर नाही. अधिकार्‍यांच्या कानाडोळ्यामुळेच अपघात टाळण्यासाठी उपाययोजना झाल्या नसल्याची नागरिक व वाहनचालकांची तक्रार आहे.