Fri, Nov 27, 2020 10:56होमपेज › Satara › शाळा आजपासून सुरू

शाळा आजपासून सुरू

Last Updated: Nov 22 2020 11:25PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आठ महिन्यांनंतर सोमवार (दि.23) पासून सुरू होत आहेत. मात्र, शाळांची घंटा वाजण्यापूर्वीच धोक्याची घंटा वाजली आहे. जिल्ह्यातील 55 शिक्षक आतापर्यंतच्या चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शाळा सुरू होत असतानाच पालक व विद्यार्थ्यांना धास्ती लागून राहिली आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील 10 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, अद्यापही अनेक शिक्षकांच्या चाचण्या बाकी आहेत. 

शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन आणि शिक्षण विभागामार्फत जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या  कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी तर कोरोना चाचणीसाठी शिक्षकांच्या रांगाही लागल्या होत्या. सातारा जिल्ह्यात शनिवार (21 नोव्हेंबर) पर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचे स्वॅब घेण्यात आले. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या 8 हजार 613 रॅट व 1 हजार 608 आरटीपीसीआर अशा मिळून 10 हजार 221 चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये सुमारे 55 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

सोमवार (दि.23) पासून सुरू होणार्‍या शाळांसाठी गणित, इंग्रजी आणि विज्ञान, तर अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित यासह इंग्रजी विषयांचे अध्ययन शाळा व महाविद्यालयामध्ये करण्यात येणार आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी, समाजशास्त्र, इतिहास, भुगोल, नागरिकशास्त्र हे विषय तर अकरावी बारावीतील विद्यार्थ्यांना मराठी, इतिहास, समाजशास्त्र, हिंदी, मानसशास्त्र, वाणिज्य व्यवस्थापन, राज्यशास्त्र, सहकार, अकौंटस यासह अन्य विषय ऑनलाईन पध्दतीने शिकवण्यात येणार आहेत. सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार असल्याने त्यादृष्टीने शाळा व विद्यालयांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

जिल्ह्यात 825 शाळा 

सतत सर्वेक्षण व कोरोना ड्युटी यामुळे अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली होती. या कोरोना संक्रमणातून काही बरे झाले, तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. सातारा जिल्ह्यात 825 शाळा व विद्यालये आहेत. त्यामधील 9वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत. त्यामध्ये नववीचे 44 हजार 676, तर 36 हजार 119 विद्यार्थी बारावीचे आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. सर्व शाळांनी माहिती अपडेट केली नसल्याने अकरावी विद्यार्थ्यांची माहिती मिळू शकली नाही.