होमपेज › Satara › सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत

सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत

Published On: Sep 25 2019 1:47AM | Last Updated: Sep 24 2019 11:12PM
सातारा : प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा  लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून 21 ऑक्टोबरलाच मतदान होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना भारत निवडणूक आयोगाने काढली असून जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी औरंगाबाद तसेच उस्मानाबाद येथून 6 हजार 500 ईव्हीएम मशिन मागवण्यात आल्या आहेत.  त्यामुळे पोटनिवडणुकीच्या तारखेबाबत असलेली उत्सुकता संपुष्टात आली असून विविध राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. 

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षातून श्री. छ. उदयनराजे भोसले हे निवडून आले होते. मात्र, चार महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आचारसंहिता लागण्यापूर्वी उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातार्‍याची पोट निवडणूक विधानसभेसोबत लागणार अशी राजकीय अटकळ होती. मात्र, भारत निवडणूक आयोगाने दि. 21 रोजी जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सातारा पोट निवडणुकीची घोषणा केली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यांत चर्चांना उधाण आलं होतं.

खासदारकीचा राजीनामा देताना व भाजपमध्ये प्रवेश करताना उदयनराजे यांनी लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच घेण्याची अट भाजपपुढे ठेवल्याची चर्चा होती.  त्यामुळे पोट निवडणुकीची अधिसूचना कधी लागणार, याची उत्सुकता ताणली गेली.  विधानसभेची आचारसंहिता घोषित होताना पोटनिवडणुकीचा उल्लेख न झाल्याने उदयनराजे गटात  अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी अधिसूचना प्रसिध्द करुन पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघासाठी 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर  आहे.  5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी केली जाणार आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून  24 ऑक्टोबरला मतमोजणी  पार पडेल. 27 ऑक्टोबरला  पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा पध्दतीने भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाची अधिसूचना प्राप्‍त होताच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विधानसभेसोबतच लोकसभा पोट निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातून ईव्हीएम मशीन दाखल होणार आहेत.

औरंगाबादहून 2 हजार 100 बॅलेट युनिट, 1 हजार 600  कंट्रोल युनिट आणि 1 हजार 800 व्हीव्हीपॅट मागवण्यात आली आहेत. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातून 3 हजार 500 बॅलेट युनिट, 3 हजार कंट्रोल युनिट आणि 3 हजार 200 व्हीव्हीपॅट  दाखल होणार आहेत. लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी 2 हजार 296 अधिकारी कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.