Mon, Aug 03, 2020 14:57होमपेज › Satara › दक्षिण व उत्तर बांधकामची खर्चासाठी लगीनघाई  

दक्षिण व उत्तर बांधकामची खर्चासाठी लगीनघाई  

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:14PMसातारा : प्रवीण शिंगटे 

सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तरमधून कोट्यवधी रूपयांची विकास कामे सुरू आहेत. जि.प.सेसमधून या कामांसाठी 15 कोटी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी दोन्ही विभागही कामांना वर्कऑर्डर देण्याच्या कामात गुंग आहेत. त्यामुळे दोन्ही विभागाचा निधी वेळेत खर्च होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. हा निधी 10 ते 12 दिवसात खर्च करण्यासाठी बांधकाम दक्षिण व उत्तरला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तरमार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध विकास कामे केली जातात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून  कोट्यवधी रूपयांचा निधी येतो. या निधीतून खासदार, आमदार यांचा स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,  किमान गरजा कार्यक्रम,   प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, इमारती व निवासस्थाने नवीन बांधकामे व देखभाल व दुरूस्ती,  पशुवैद्यकीय इमारती व निवासस्थाने नवीन बांधकामे व देखभाल दुरूस्ती, जिल्हा ग्रामीण विकास संस्था यंत्रणा निधीतील कामे,विशेष घटक योजना,रोजगार हमी योजना, गौण खनिज निधी, तिर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळे विकास कामे, गट अ व ब रस्ते दुरूस्ती, जिल्हा व  इतर रस्ते, बारावा वित्त आयोग, ग्रामीण विकास कार्यक्रम आदी योजनांखाली कामे करण्यात येतात.

जि.प. सेसमधून बांधकाम विभाग उत्तरला सुमारे10 कोटी 76 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी अद्यापही या विभागाकडे निधी येत आहे. जि.प. कार्यालयीन इमारती जिल्हास्तर देखभाल दुरूस्तीसाठी 1 कोटी 71 लाख 54 हजार रुपयांचा निधी मंजूर असला तरी सुमारे 50 लाखांहून अधिक निधी खर्च झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जि.प. मुख्यालय तसेच ऑडिटोरियम वीज व पाणीसाठी 55 लाखापैकी 52 लाख 3 हजार रुपये खर्च झाले आहेत. स्व.यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह  देखभाल व दुरूस्तीसाठी  सुमारे 23 लाख 25 हजार रुपयांची तरतूद केली आहे. सभागृह व परिसर स्वच्छतेसाठी 4 लाखाची तरतूद केली होती त्यापैकी फक्त 28 हजार रुपये खर्च झाले आहेत. परिसर स्वच्छ केला तरच त्याला चांगली शोभा येणार आहे. जि.प. रस्त्यांच्या मुळ व अपूर्ण कामासाठी 2 कोटी 75 लाख 34 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, करण्यात येणारे रस्ते शासन नियमानुसार सुस्थितीत होतात का? रस्त्याची गुणनियंत्रण तपासणी होते का? असे प्रश्‍न यानिमित्ताने पुढे येत आहेत.

जि.प. इमारतीच्या मुळ व अपूर्ण कामासाठी 2 कोटी 3 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मात्र, झालेल्या इमारतींची कामे सुस्थितीत आहेत का? याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.उद्यान व बागांसाठी 8 लाख 75 हजार रुपयांची तरतूद केली त्यापैकी 8 लाख 66 हजार रुपये कोणत्या बागांवर खर्च झाले?

जिल्हा परिषद बांधकाम दक्षिणसाठी जि.प.सेसमधून 3 कोटी 51 लाख 82 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. मात्र 3 कोटी 51 लाख 50 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे  सांगण्यात आले. त्यामुळे बांधकाम दक्षिण व उत्तर विभागात मार्च महिना जवळ आल्याने निधी संपविण्याची लगीनघाई जोरात सुरू आहे. वर्षभर या दोन्ही विभागांनी गांधारीची भुमिका घेतली होती काय? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद सेसमधून मिळणारा निधी विविध कामांवर खर्च झाला नाही तरी हा निधी पुढील कामासाठी खर्च  केला जातो. तसेच शासनाकडून येणारा निधी हा दोन वर्षात त्या त्या कामासाठी खर्च करण्याच्या सूचना आहेत त्यानुसार जिल्हा परिषदेने ज्या ठेकेदाराने काम केले आहे त्याने केलेल्या कामाच्या टप्प्यानुसार हा निधी खर्च होत असतो. त्यामुळे  निधी माघारी जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. तसेच विविध कामांसाठी दिलेला  निधी हा मार्चअखेर खर्च होत असतो  असे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

 

Tags : satara, satara news, satara zp, funds,