Fri, Oct 30, 2020 08:07होमपेज › Satara › कृष्णानगरजवळील मातीचा ढिगारा यमदूत

कृष्णानगरजवळील मातीचा ढिगारा यमदूत

Published On: Aug 25 2018 7:31AM | Last Updated: Aug 24 2018 8:50PMखेड : अजय कदम

सातारा- कोरेगाव रस्त्याचे रुंदीकरण करताना कृष्णानगर येथील कण्हेर कालव्यापर्यंत केलेले काम वाहनचालकांसाठी यमदूत ठरत असून सुरक्षेसाठी ठेकेदाराने येथे मातीचा ढिगारा केला आहे. या ठिकाणी रोजच अपघातांची मालिका घडत असून अनेक वाहने थेट कालव्यातच उडी घेत आहेत. त्यामुळे हे ठिकाण धोकादायक बनले आहे. 

सातारा-सोलापूर हा जिल्ह्यातील प्रमुख राज्यमार्ग असून हा मार्ग हैद्राबाद, गाणगापूर व कर्नाटकातील शहरांना जोडला असल्याने तो राष्ट्रीय महामार्ग बनला आहे. या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.  पुणे-बेंगलोर या महामार्गाचे चौपदरीकरण करताना बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाणपूल झाल्याने सातारा-कोरेगाव मार्ग काही प्रमाणात सुरक्षित झाला आहे. मात्र पोवई नाक्यापासून संगममाहुलीपर्यंत झालेल्या टपर्‍यांच्या अतिक्रमणामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. बॉम्बे रेस्टॉरट चौकात सकाळी 10 व सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वाहतुकीची कोंडी होते. तर सद्या उड्डाणपुलाखाली पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. 

पोवई नाका ते माहुलीपर्यंत दुभाजकांसह रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे ठेकेदाराने चांगभलं केले असून कामाच्या दर्जाबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील हे काम कृष्णानगर येथील कण्हेर कालव्याच्या पुलापर्यंत पूर्ण झाली आहे. कृष्णानगर येथील वीज वितरण कार्यालय ते कण्हेर कालव्यापर्यंतचा रस्ता तीव्र उताराचा आहे. यामार्गावर कण्हेर कालव्यावर जुना पूल आहे. मात्र कालव्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने ठेकेदारांनी वाहनांच्या सुरक्षेसाठी कालव्यासमोर मातीचा ढिगारा रचला आहे. तीव्र उतारावरुन येणार्‍या वाहनांना हा मातीचा ढिगारा लवकर लक्षात येत नाही. बर्‍याच वेळा वाहने ढिगार्‍यावर येवून धडकतात.

तर काही वाहने चालकासह थेट कालव्यामध्ये पडतात, असे प्रकार या ठिकाणी सातत्याने होत असून येथील ठिकाण आता अपघात प्रवण क्षेत्र झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एक कार चालक कारसह मातीच्या ढिगार्‍यावर गेला तर रात्री कोरेगावकडे निघालेले युवक दुचाकीसह कालव्यात पडले. परिसरातील युवकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे हा पुल धोकादायक झाला असून येथील वर्दळीच्या परिसरात भाजी मंडई रस्त्यावरच भरत असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  रात्रीच्यावेळी या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्याने तीव्र उतारावरुन येणार्‍या वाहनांना कालव्यानजिक टाकलेला मातीचा ढिगारा दिसत नसल्याने अपघातांची मालिका सुरु असून मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का?असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

वेळीच उपाययोजना न केल्यास...

कृष्णानगर येथील वीज वितरण कार्यालय ते कण्हेर कालव्यापर्यंत तीव्र उतार असल्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग जास्त असतो. कालव्यावर पूल नसल्याने रस्ता वळविण्यात आला आहे. नवीन पूल होण्याच्या ठिकाणी ठेकेदाराने सुरक्षिततेसाठी मातीचा ढिगारा टाकला आहे. रात्रीच्यावेळी वाहनाचा वेग व मातीचा ढिगारा अचानक दिसल्याने वाहनचालकांची भंबेरी उडताना दिसते. या ठिकाणी नवीन पूल होईपर्यंत दिशादर्शक फलक उभे करणे गरजेचे आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.