होमपेज › Satara › विद्यार्थ्यांचे भविष्य धुरकटण्याचा धोका

विद्यार्थ्यांचे भविष्य धुरकटण्याचा धोका

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 8:20PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर यार्डच्या परिसरात सिगारेट-तंबाखूची विक्री करण्यास कायद्याने बंदी असली  तरीही जिल्ह्यातील बहुतांशी  शाळा व महाविद्यालयाच्या अवतीभोवती तंबाखू व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री राजरोसपणे सुरुच आहे. केंद्र व राज्य सरकारने याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत, असे असूनही विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत चालले असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.  शाळा व महाविद्यालयाजवळ सुरु असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीमुळे अल्पवयीन विद्यार्थी तंबाखू व सिगारेटच्या आहारी जात आहेत. अल्पवयात सिगारेटचा धूर काढण्याची सवय  जडल्याने चिमुकल्यांचे आयुष्य   एकप्रकारे ‘धुरकटत’ चालले आहे.

 शासकीय आदेशाची  अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाबरोबर विक्रेत्यांचीही आहे. मात्र तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कुणाचाही मुलाहिजा न बाळगता शासकीय नियमांना आव्हान देत शाळा व महाविद्यालयाच्या लगतच दुकाने थाटून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे सुरु असलेल्या या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 

संपूर्ण देशभरात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादनांसाठी 2003 चा कायदा राबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील पोलिस, आयकर, कस्टम, विक्रीकर, आरोग्य, वाहतूक विभागातील अधिकारी, पोस्टमास्तर, हेडमास्तर, प्राचार्य, शाळा निरीक्षक, रेल्वे अधिकारी व इतर  राजपत्रित अधिकार्‍यांनाही यापूर्वीच अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इतक्या सर्व यंत्रणांना अधिकार असूनही शैक्षणिक संस्थांच्या अवतीभवती  सिगारेट-तंबाखूंची विक्री व सेवन सर्रास सुरु असल्याचे दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन वगळता कुणीही शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही.