होमपेज › Satara › वाढलेला टक्‍का कोणासाठी ठरणार मारक ?

वाढलेला टक्‍का कोणासाठी ठरणार मारक ?

Published On: Apr 25 2019 1:46AM | Last Updated: Apr 24 2019 9:53PM
कराड : चंद्रजित पाटील

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. 2014 साली कराड दक्षिणमध्ये 58.64 टक्के मतदान झाले होते. या टक्केवारीत वाढ होऊन दक्षिणेत सुमारे 63 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार टक्के मतदान अधिक झाले असून या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार? काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नाराजीचा फटका बसणार का ? याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना केवळ 10 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. उदयनराजे भोसले यांना 62 हजारांच्या घरात तर अपक्ष उमेदवार पुरूषोत्तम जाधव यांना तब्बल 52 हजाराहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळेच ही खा. उदयनराजे भोसले यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात होती. त्यातच 2019 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच कराड दक्षिणमध्ये काँग्रेसतंर्गत मतभेद दिसून आले. 

माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर गटाचे नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर हे विद्यमान खासदारांच्या व्यासपीठावर गेलेच नाहीत. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे साधे निमत्रंणही अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना देण्यात आले नव्हते. अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी जाहीरपणे कोणाचाही प्रचार केला नसला तरी त्यांचे अनेक समर्थक मात्र ना. नरेंद्र पाटील यांच्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. ना. नरेंंद्र पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रचारावेळी टीकाही केली होती. तसेच 2014 मधील विधानसभा निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरूद्ध अपक्ष निवडणूक लढवणार्‍या विलासराव पाटील उंडाळकर यांना जाहीरपणे पाठिंबा घेत ना. नरेंद्र पाटील यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.

एकीकडे उंडाळकर गटाची अशी अवस्था असतानाच भाजपा नेते डॉ. अतुल भोसलेे हे नरेंद्र पाटील यांना कराड दक्षिणेत जास्तीत जास्त मताधिक्य मिळावे, यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. विलासराव पाटील - उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले गट नरेंद्र पाटील यांच्या मताधिक्यासाठी झटत असल्याने मागील लोकसभा निवडणुकीतील परंपरा खंडीत करत कराड दक्षिणमध्ये खा. उदयनराजे भोसले यांच्यावर ना. नरेंद्र पाटील हे किती हजारांचे मताधिक्य घेणार ? याबाबत त्यामुळेच तर्कविर्तक सुरू झाले आहेत. 

तसेच राष्ट्रवादीचे समर्थक मात्र खासदारांनाच मताधिक्य मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करत आहेत. त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारक तर तो कोणासाठी मारक ठरणार ? याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या सर्वांची उत्तरे 23 मे रोजीच मिळणार असून तोपर्यंत हे तर्कविर्तक सुरूच राहणार आहेत.

बालेकिल्ल्यात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला...

कराड दक्षिणमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण गट, शहरात राजेंद्रसिंह यादव गट आणि आ. बाळासाहेब पाटील गट खासदारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. मात्र मतदारांमध्ये नाराजी होती, हे वास्तव अमान्य करून चालणार नाही. या तिन्ही गटांनी शहरासह तालुक्यात नाराजी दूर करत आघाडीचा विजय कसा आवश्यक आहे ? हे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मतदारांच्या पचनी हे कितपत पडले आहे ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. कराड दक्षिणेत काँग्रेसची पर्यायाने आ. पृथ्वीराज चव्हाण गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.