Sat, Jul 11, 2020 21:12होमपेज › Satara › १४८ वर्षांची परंपरा असणारे संत घाडगेनाथ मंदिर

१४८ वर्षांची परंपरा असणारे संत घाडगेनाथ मंदिर

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 9:07PMढेबेवाडी :  विठ्ठल चव्हाण 

श्री विठोबा घाडगे उर्फ श्रीसंत घाडगेनाथ महाराजांनी 1864 साली समाधी घेतल्यानंतर त्यांचे शिष्य कृष्णनाथ महाराज (कुशाबा वाणी) यांनी श्रीसंत योगी गोदडनाथ महाराजांच्या आदेशानुसार संत घाडगेनाथ महाराजांच्या समाधीस्थळी 1870 साली मंदीर उभारणीचे काम केले तेंव्हापासून दर आषाढी, कार्तिकी वारी बरोबरच दर एकादशीला विठ्ठल रखुमाई दर्शना बरोबरच घाडगेनाथ समाधी दर्शनाची गेल्या 148 वर्षाची परंपरा असलेले कोळे गांव ता.कराड प्रतिपंढरपुर म्हणून ओळखले जाते. कुठरे (ता.पाटण) येथील  अत्यंत गरिब व कर्जबाजारी कुटुंबात जन्मलेले विठोबा घाडगे चाकरी निमित्ताने कोळ्यात आले.

पुढे शाहू महाराजांच्या सेवेत गेले आणि विठ्ठल भक्तीला वाहून घेतले व  महान संत श्रीगोदडनाथ महाराजांचे पट्टशिष्य होऊन पंधरवड्याची वारी करणारे वारकरी बनले आणि संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीत आणि समाज सेवेत घालविणार्‍या या विठ्ठल भक्ताचा आपला मृत्युसमय ओळखून मृत्युपुर्वीच समाधी बांधून घेणारा श्रीसंत घाडगेनाथ झाला. 107 वर्षाचे आयुष्य जगलेल्या श्री.घाडगेनाथ महाराजांनीआपल्या जीवनात  थेट विठ्ठलाशी संवाद साधला त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक चमत्कार करून जन सेवा केली, विठ्ठलाचे उत्कट भक्त असलेल्या घाडगेनाथानी 100 वर्षापर्यंत पायी चालत, पाच वर्षे घोड्यावरून तर दोन वर्षे डोलीतून पंढरीची वारी केली.

आपला मरणकाळ जवळ आल्याचे ओळखून आपले शिष्य श्री.कुशाबा वाणी यांना समाधी बांधण्याची आज्ञा केली आणि 107 वर्षी 1864 साली  पंढरीला जाता जाता बोंबाळेवाडी ता.माण येथून परत फिरून कोळ्याला आले व समाधिस्थ झाले अशी अख्ख्यायिका आहे. श्रीसंत घाडगेनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे शिष्य कुशाबा वाणी श्रीसंत गोदडनाथ महाराजांच्या दर्शनासाठी कर्जतला( जि.अहमदनगर) गेले तेंव्हा त्यानी कुशाबा यांना समाधीस्थळावर मंदिर बांधण्याचा सल्ला दिला आणि कुशाबानी आपल्या गुरूचे मंदिर बांधकाम हाती घेतले,मात्र पैशाचा प्रश्‍न निर्माण झाला तेंव्हा मजुरांना तू दगड दे पुढचे बघूअसे संत गोदडनाथांनी सांगितले तेंव्हा दगड दिल्यावर त्याचे पैसे होत असत मात्र त्यावेळी औंध संस्थानाकडून मिळाले असे सांगितले जात होते असे  वर्णन घाडगेनाथ महाराजांच्या चरित्र ग्रंथात आढळते. 148 वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर विठ्ठल भक्तांचे माहेर बनले आहे.