Wed, Aug 12, 2020 20:41होमपेज › Satara › महू धरणातून वाळूचा राजरोस उपसा

महू धरणातून वाळूचा राजरोस उपसा

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:47PM

बुकमार्क करा

मेढा : भास्कर धनावडे  

जावली तालुक्याच्या महू धरणाच्या दापवडी व  रांजणी परिसरातील ओढा व तसेच धरणाच्या कोरड्या पात्रातून  गेल्या काही दिवसांपासून वाळूचा रात्रंदिवस बेसुमार उपसा झाला आहे. त्यामुळे धरण पूर्ण होण्याआधीच  ओढे ओबड धोबड झाले आहेत. वाळूचा अनधिकृत उपसा करणारे  रातो रात जेसीबीने जवळच्या शेतांमध्ये वाळूचे ढीग करून ठेवत  असून या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन वाळू चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जावली तालुक्यातील महू धरणाच्या उर्वरित कामाला नव्याने सुरुवात होत असतानाच या धरणातून वाळू माफियांकडून बेकायदा वाळू उपसा सुरू  आहे. धरणाच्या कामासाठी पाणी कमी केल्याने वर आलेल्या वाळूवर महसूल विभागाच्या वरदहस्ताने डल्ला मारण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरु आहे. महसूल विभाग मात्र या वाळू चोरीकडे डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका का बजावतोय? हा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

बोरखेडा गावाला गिरणा नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या पंपिंग हाऊसजवळच वाळूचा मोठा उपसा झाला आहे. असाच उपसा सुरू राहिल्यास, भविष्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाळूचा बेसुमार उपसा करणार्‍यांना स्थानिक नेते अप्रत्यक्षरित्या सहकार्य करीत असल्याने रात्रंदिवस ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील वाळू उपसून तिचा जवळच्या शेतांमध्ये साठा करण्याचे प्रकारही येथे होत आहेत. नदीपात्राला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, सरपंच बाळू पाटील यांनी काही शेतकर्‍यांच्या मदतीने रस्त्यावर पाणी सोडून ट्रॅक्टर येण्या-जाण्याचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता वाळू उपसा करणार्‍यांनी या रस्त्यातून ट्रॅक्टरने वाहतूक सुरू ठेवली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी धरणस्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांची पाठ फिरताच या धरणाकडे गौण खनिजाच्या लुटीसाठी ठेकेदार व व्यावसायिक घिरट्या घालू लागले आहेत. धरणाच्या कामासाठी पाण्याची पातळी कमी केल्याने वाळू नजरेच्या टप्प्यात आली. याचा फायदा घेत या धरणातून गेले काही दिवसांपासून वाळूची लयलूट सुरु आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत महसूल विभागाशी संपर्क साधल्यास कारवाई करतो अशी जुजबी उत्तरे दिली जातात. प्रत्यक्षात कारवाई मात्र काहीच होताना दिसत  नाही. महसुलचे अधिकारी अळीमिळी गुपचिळीची भूमिका बजावताहेत. 

महसूल विभागाचे या वाळू चोरांशी काहीतरी साटेलोटे असल्याशिवाय हे चोरटे अशा प्रकारचे धाडस करणार नाहीत. एकीकडे बाधित धरणग्रस्तांचे प्रश्‍न अद्यापही लोंबकळत आहेत. काहींचे अद्यापही पुनर्वसन झाले नसताना त्यांचा विरोध मोडीत काढून धरणाचे काम सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. दुसरीकडे मात्र धरण परिसरातील गौण खनिजावर डोळा ठेऊन लूट करणार्‍या प्रवृत्तींना अधिकारी व पदाधिकार्‍यांकडून बळ दिले जात असल्याचे दिसून येत आहे.