Sat, Jul 11, 2020 14:04होमपेज › Satara › एस. टी. चालक-वाहक नव्या ढंगात

एस. टी. चालक-वाहक नव्या ढंगात

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 9:02PM

बुकमार्क करा
औंध : सचिन सुकटे

सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये नवनवीन बदल होत असून मागील अनेक दशकांपासून प्रवाशांच्या सेवेत असणार्‍या एसटी कर्मचार्‍यांचा गणवेशही आता बदलणार आहे. त्यामुळे कायम खाकी गणवेश परिधान करणारे एसटीचे चालक, वाहक येत्या काही वर्षात नव्या रंगात व ढंगात दिसणार आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, एसटी महामंडळाच्या विविध सोळा संवर्गातील कर्मचारी मागील जवळजवळ 71 वर्षांपासून एकाच गणवेशामध्ये आपण पाहत आहोत. येत्या काही दिवसात यामध्ये बदल होणार आहे. एसटी कर्मचार्‍यांचा गणवेश नेमका कसा असावा? याचे डिझाईन राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेकडून तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. नुकतेच सुरू झालेले 2018 हे वर्ष एसटी महामंडळासाठी परिवर्तन वर्ष म्हणून मानले जात आहे. यावर्षी सुरू केल्या जाणार्‍या प्रवाशांसाठी व कर्मचार्‍यांसाठीच्या योजनांमुळे या क्षेत्रात मोठा कायापालट होणार आहे. यामध्ये एसटीच्या सर्व विभागातील कर्मचार्‍यांना एकाचवेळी गणवेश वाटप केले जाणार आहे. यामध्ये एसटीचे चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, क्लार्क, एसटी तपासणीस व अन्य अधिकारी यांचा गणवेश पदानुसार वेगवेगळा असणार आहे. 

मागील सात दशकांमध्ये कर्मचार्‍यांच्या गणवेशामध्ये कोणताच बदल न केल्याने  त्यांच्या मध्ये एकप्रकारे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी कर्मचार्‍यांचा ड्रेसकोड हे त्या संस्थेचे भूषण व गौरवास्पद बाब मानली जात आहे. कार्पोरेट जमान्यात अनेक कंपन्यांनी या सर्व बाबींबरोबरच भौतिक सुविधांना महत्त्व दिले आहे. त्याचबरोबर खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी अप टू डेट वातानुकुलीत    वाहनांबरोबरच  आकर्षक ड्रेसकोड पध्दत सुरू केल्याने एसटीनेही त्यादिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

याअगोदर एसटी महामंडळाकडून एसटीच्या सोळा संवर्गातील कर्मचार्‍यांना गणवेशासाठी कापड दिले जात होते पण, ते कापड पसंत पडत नसल्याने कर्मचारी आपापल्या सोयीने ते शिवून घेत असत, त्यामुळे त्यांच्या मध्ये एकवाक्यता नव्हती.

हे सर्व ध्यानात घेऊन परिवहनमंत्र्यांनी नवीन ड्रेेसकोड पध्दती अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यात याची अंमलबजावणी होणार आहे. एसटी कर्मचार्‍यांना नेमका कोणता रंग व ड्रेस मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन निर्णयामुळे एसटीसह कर्मचारीही प्रवाशांना नव्या रंगात व ढंगात दिसणार आहेत.

रंगसंगतीनुसार गणवेश असणार

एसटी कर्मचारी, पदाधिकार्‍यांशी प्रातिनिधिक स्वरूपात चर्चा करून एसटी गणवेशाचे नवीन प्रारुप तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये भौगोलिक परिस्थिती, हवामान, रंगसंगती यासर्व बाबींचा विचार गणवेशासाठी करण्यात आला आहे.