होमपेज › Satara › दोनशेहून अधिक कलाकार बेरोजगार

दोनशेहून अधिक कलाकार बेरोजगार

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 10:13PMसातारा : विशाल गुजर

थर्माकोल वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील दोनशेहून अधिक कलाकारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली असून सुमारे दोन कोटी रुपयांच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. आता पुढचा पर्याय काय शोधावा या अवस्थेत ही मंडळी आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात थर्माकोलची मंदीरे, लग्नात नवरा, नवरीची, नावे आडनावांची अक्षरे, जावळ, बारसे, वाढदिवस आदी कार्यक्रमात नावे, सजावट करण्यासाठी थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र या निर्णयामुळे थर्माकोल कलाकृती साकारणार्‍या कलाकारांना अगदी दोनशे ते दहा हजार रुपयांपर्यंत मेहनताना मिळत होता. गणेशोत्सव जरी वर्षातून एकदा येत असेल तर त्याचे काम वर्षभर सुरु असायचे. त्यात कलाकार थर्माकोल  घेवून त्यावर कार्व्हींग, कलाकुसर करीत आहेत.

त्यातून वर्षभर हा व्यवसाय सुरु असायचा. एकूणच सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल या व्यवसायातून होत होती. यात सातारा तालुक्यातील 38, कराड 43, वाई 30, फलटण 27, माण-खटाव 20, पाटण 13, खंडाळा 12, जावली 10, महाबळेश्‍वर 12, कोरेगाव 17 असे एकूण दोनशे बावीस कलाकार या व्यवसायात होते. त्यात अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवातही थर्माकोलचा वापर करायचा नाही. त्यामुळे एकूणच पर्यावरणाचा विचार करुन हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, दुसरा पर्याय नसल्याने थर्माकोलची मंदीरे, सजावटीचे काम करणार्‍यांमध्ये दुसरा रोजगार काय करायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात नियमित 100 ते 200 किलो थर्माकोल 10 एम.एम. ते 500 एम.एम. पर्यंतच्या थर्माकोल मागणीप्रमाणे विक्रीसाठी येतो. त्यात गणेशोत्सवाच्या काळात सुमारे एक टन थर्माकोलची विक्री होते. त्यात सातार्‍यासह कोल्हापूर, सांगली येथे मंदीरे, सजावटीसाठी हा थर्माकोल नेला जातो. किंमतही अगदी 10 रुपयांपासून घेईल त्या साईजनुसार आहे. पॅकेजिंग करीता वापरल्या जाणार्‍या थर्माकोलचा मोठा प्रश्‍न आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना त्याचे पॅकींग असते. थर्माकोल शॉकऑब्झरचे काम करतो. आतील वस्तू सुरक्षित ठेवतो.

अनेक ठिकाणी नवीन फ्रीज, टिव्ही, मोबाईल, अगदी मोटरसायकल घेतली तरी काही ठिकाणी थर्माकोल सुरक्षिततेसाठी पॅकींग म्हणून वापरला जातो. हा थर्माकोल नागरिक घरात कचरा नको म्हणून बाहेर फेकून देतात आणि हाच प्रदूषणालाही कारणीभूत असतो. याचाही विचार व्हावा, असा सूर नागरीकांतून आळवला जात आहे. राज्य सरकारने प्लास्टिक बंदी आणि थर्माकोल बंदी मार्चमध्येच जाहीर केली होती. मात्र, कायद्याच्या अंमलबजावणीस गणेशोत्सव काळाच्या अगोदर दोन महिने सुरुवात झाली. गणेशोत्सव काळात लागणारे मखर आणि अन्य सजावटी साहित्यांच्या उत्पादनाची तयारी सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. कोट्यवधीचे थर्माकोल आणि त्यापासूनच्या वस्तू तयार झाल्या आहेत. त्यामुळे मखर विक्रेत्यांसह इतर साहित्य विकणारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

बायोफोनचा पर्याय उपलब्ध

थर्माकोल हा एक्स्पेडेड पॉलिस्ट्रीन नावाच्या पदार्थापासून बनले आहे तर याला पर्याय म्हणून बायोफोनपासून बनविलेल्या सीटही सध्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, थर्माकोलच्या किमतीपेक्षा दहा पटीने त्याची किंमत आहे. जर त्यांच्या किंमती कमी झाल्या तर हा पर्यायही पुढे येवू शकतो, असे मत अनेक विक्रेत्यांनी व्यक्त केले.

गेल्या 15 वर्षांपासून थर्माकोलची लेटरींग, डिझाईन सजावटीसाठी लागणारे साहित्य, मखरे बनविण्याचे काम करत आहे. राज्य सरकारने नुकतीच थर्माकोल बंदी केल्याने इतके वर्षे कष्टाने सुरू केलेला व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे). गणेशोत्सवासाठी आणलेले लाखो रूपयांचे थर्माकोल जाळून टाकण्याची वेळ आली आहे.  - घनश्याम सांडीम, व्यावसायिक सातारा.