होमपेज › Satara › खटाव राष्ट्रवादीतील संभाव्य बंड टळले सभापती-उपसभापतींचे राजीनामे  

खटाव राष्ट्रवादीतील संभाव्य बंड टळले सभापती-उपसभापतींचे राजीनामे  

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 11:22PMखटाव : प्रतिनिधी

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर खटाव तालुका पंचायत समितीचे सभापती  संदीप मांडवे आणि उपसभापती कैलास घाडगे यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांना  अविश्‍वास ठराव आणण्याचा प्रश्‍नच उदभवला नाही. नाराजांनी काँग्रेस आणि भाजपाच्या प्रत्येकी दोन सदस्यांना बरोबर घेऊन मोट बांधल्याचे ध्यानात येताच राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी पदाधिकार्‍यांना राजीनामे देण्यास भाग पाडले. दोघांनीही राजीनामे दिल्याने संभाव्य बंड आणि घडणार्‍या उलटसुलट घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला.

खटाव पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी  ठरवून दिलेला कार्यकाळ संपला तरी राजीनामे न दिल्याने पक्षाच्याच सहा सदस्यांनी नाराज होवून अविश्‍वास ठरावाचे हत्यार उपसले होते. संपूर्ण जिल्हाभर या प्रकरणाची चर्चा झाली होती. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी प्रयत्न करुनही पदाधिकारी आणि नाराज सदस्य बधले नाहीत. शुक्रवारी प्रांतांनी अविश्‍वास ठरावाबाबत विशेष बैठक आयोजित केली होती. 

गेल्या चार दिवसांपासून नाराज सहा सदस्यांनी अविश्‍वास ठरावाला लागणारे पुरेसे संख्याबळ जुळविण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले होते. अगदी माण तालुक्यात धडक मारुन, काँग्रेसच्या हायकमांडशी साधक बाधक चर्चा करुन  त्यांचे  दोन सदस्य गोटात सामील करुन घेण्यात यश मिळविले होते. खबरदारी म्हणून भाजपाच्या दोन सदस्यांबरोबरही नाराजांनी संधान साधले होते. गुरुवारी रात्री राष्ट्रवादीच्याच सहा नाराज सदस्यांपैकी एका सदस्याने गोटातून काढता पाय घेतला होता. त्याबाबत उलट सुलट चर्चाही सुरु झाल्या होत्या मात्र अविश्‍वास ठराव यशस्वी करण्यासाठी लागणार्‍या पुरेशा संख्याबळाचे नियोजन झाल्याने इतर पाच सदस्य नॉट रिचेबल झाले होते. शुक्रवारी होणार्‍या बैठकीत काय होणार? पदाधिकारी राजीनामे देणार का ? अविश्‍वास ठराव यशस्वी होणार का ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

खटाव    तालुका राष्ट्रवादीअंतर्गत  घडणार्‍या घडामोडींमधे  गेल्या दोन दिवसांपासून अजित दादांनीही लक्ष घातले होते. त्यांचे गुरुवारी तालुक्यात आगमन झाले होते. शुक्रवारी सकाळी अविश्‍वास ठराव दाखल करण्यात सहभागी असणार्‍या राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांनी टाईट फील्डिंग लावली होती. काँग्रेस आणि भाजपाच्या सदस्यांनाही त्यांनी बरोबर घेतले होते. नाराज सदस्य माघार घ्यायची शक्यता नसल्याने अजित दादांसह राष्ट्रवादीच्या इतर वरिष्ठांनी सारासार विचार करुन सभापती आणि उपसभापतींना राजीनामे देण्याचे आदेश दिले. खटाव बाजारसमितीत दोघांचेही राजीनामे तयार करण्यात आले. उपसभापती कैलास घाडगे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सभापती संदीप मांडवे यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकार्‍यांकडे तर  सभापती मांडवे यांनी सातार्‍यात जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आपल्या पदाचा  राजीनामा सादर केला.

अगदी शेवटच्या क्षणी पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिल्याने पुढील नाट्यमय घडामोडी टळल्या असल्या तरी राष्ट्रवादीअंतर्गत असणारी धुसफूस अविश्‍वास ठरावाच्या प्रस्तावामुळे चव्हाट्यावर आली. पक्षशिस्त मोडून वरिष्ठांचे आदेश डावलण्यापर्यंत पदाधिकारी आणि सदस्यांची मजल गेली. या गोष्टी पक्षहिताला बाधक असल्याचे वरिष्ठ खाजगीत सांगत आहेत. प्रत्यक्षात निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या वरिष्ठांना मर्यादा पडत असल्याचे आजपर्यंत अनेक वेळा दिसून आले आहे. खरे तर या प्रकरणाचा चेंडू अजित दादांच्या कोर्टापर्यंत जायलाच नको  होता. मागे अशाच एका राजीनामा नाट्यात दादांनी तालुक्याच्या सर्व कारभार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.  भविष्यात पुन्हा असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी त्यांचा वचक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.