Wed, Jul 08, 2020 09:23होमपेज › Satara › संशोधन केंद्राची शास्त्रज्ञांना उत्सुकता

संशोधन केंद्राची शास्त्रज्ञांना उत्सुकता

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 8:31PM

बुकमार्क करा

कराड : अशोक मोहने 

देशभरातील शास्त्रज्ञ, संशोधकांचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील हजारमाची येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भूकंप संशोधन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

भूकंपावरील संशोधनासाठी कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात सात कि.मी. पर्यंत बोअर मारण्यात येत आहे. यामध्ये सेन्सरव्दारे भूगर्भातील हालचाली टिपल्या जाणार आहेत. त्यावर हजारमाची येथे विज्ञान प्रयोगशाळेत संशोधन केले जाणार आहे. भूकंप संशोधनासाठी कोयना विभाग सर्वोत्तम असल्याचे मत शास्त्रज्ञ, संशोधकांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील भूगर्भातील संशोधनाची उत्सुकता देशभरातील शास्त्रज्ञांना लागून राहिली आहे.  भूकंप आणि भूगर्भातील हालचालींवर संशोधन करणारा  देशातील पहिला प्रोजेक्ट हजारमाची (कराड) येथे साकारत असून भूकंप संशोधनासाठी कोयना विभागातील गोठणे ता.पाटण येथे भूगर्भात सुमारे 7 कि.मी.पर्यंत बोअरहोल मारण्यात येत आहे. आत्तापर्यंत तीन कि.मी.हून अधिकचे काम पूर्ण झाले आहे.

त्या आधारे भूकंपादरम्यान व नंतर भूगर्भात कोणते भौगोलीक व रासायनिक दृष्ट्या बदल होत आहेत,याच्या नोंदी घेवून त्या बदलांवर पुढील दहा ते पंधरा वर्षे बारकाईने लक्ष ठेवून व त्यावर संशोधन करून निष्कर्ष काढले जाणार आहेत. या संशोधनातून भूकंप उत्पत्तीच्या अनुषंगाने नवी  माहिती व ज्ञान मिळणार आहे. हे केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे संशोधन ठरणार आहे, अशी माहिती येथील भूभौतिकी अनुसंधान प्रयोग शाळेतील सूत्रांनी दिली.

1967 मध्ये 6.3 रिस्टर स्केलचा कोयना जलाशयात झालेला भूकंप देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठा भूकंप म्हणून नोंदला गेला आहे.या शिवाय गेल्या पन्नास वर्षात येथे हजारो कमी, अधिक तीव्रतेचे भूकंप झाले आहेत. विशेष म्हणजे या सर्व भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस ते तीस कि.मी. अंतरातच नोंदला गेला आहे. त्यामुळे कोयना धरण परिसर हा भूकंपाचा अभ्यास करणारे देशातील एकमेव सर्वोत्तम ठिकाण आहे,असे शास्त्रज्ञांचे मत आहे.  

केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हा महत्वकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. हजारमाची येथील विज्ञान प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत,संग्रहालय, तज्ज्ञांची निवासस्थाने, आणि तेथील यंत्रणा ही कामे गतीने सुरू आहेत. गोठणे येथे  तीन कि.मी.हून अधिक खोल बोअर होत मारण्यात आले असून वेगवेगळ्या सात ठिकाणच्या खडकांचे नमुने शास्त्रज्ञांनी घेतले आहेत. त्यावर हैद्राबाद एनजीआरआय सेंटरमध्ये संशोधन सुरू आहे.  सुमारे 470 कोटी रूपये अंदाजीत खर्चाच हा प्रोजक्ट आहे.